गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या अध्यक्षांवर एकाधिकारशाहीचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 07:37 PM2018-03-26T19:37:23+5:302018-03-26T19:37:23+5:30

गोव्यात सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार लवू मामलेदार यांनी पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्यावर तोफ डागताना ढवळीकर यांनी गेले वर्षभर एकाधिकारशाही चालविली असल्याचा आरोप केला आहे.

The President of the Maharashtrawadi Gomantak Party in Goa is accused of Monopoly | गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या अध्यक्षांवर एकाधिकारशाहीचा आरोप 

गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या अध्यक्षांवर एकाधिकारशाहीचा आरोप 

Next

पणजी  - गोव्यात सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार लवू मामलेदार यांनी पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्यावर तोफ डागताना ढवळीकर यांनी गेले वर्षभर एकाधिकारशाही चालविली असल्याचा आरोप केला आहे. राज्यात आघाडी सरकार स्थापनेसाठी मगोपच्या समर्थनाचे पत्र अध्यक्षांनी कोणालाही विश्वासात न घेता किंवा कोणताही ठराव न घेताच राज्यपाल तसेच सभापतींना सादर केल्याचा आरोपही त्यांनी केला. 

पत्रकार परिषेदत मालमेदार म्हणाले की, ‘ढवळीकर यांनी अनेक दा सांगूनही वर्तन सुधारले नाही. पक्षाची हानी होईल म्हणून एवढे दिवस गप्प होतो परंतु आता नाईलाजाने तोंड उघडावे लागत आहे.’ अध्यक्षांनी केलेले ३६ अपराध मी नोंद करुन ठेवले आहेत आणि त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत. योग्यवेळी एकेका प्रकरणाचा भांडाफोड करीन, असा इशाराही त्यांनी दिला. सध्या अस्तित्त्वात असलेले सरकार मगोप अध्यक्षांच्या ‘फ्रॉड’ पत्रावर चालले आहे, असे उत्तर त्यांनी एका प्रश्नावर दिले. 

ढवळीकर यांची ही एकाधिकारशाही १२ मार्च २0१७ पासून सुरु झाली. केंद्रीय समितीवर १५ सदस्य आहे त्यापैकी कोणालाही विश्वासात न घेता मनमानी निर्णय ते घेत आहेत. सरकार स्थापनेसाठी समर्थनाचे पत्र देताना पक्षाच्या तिन्ही आमदारांनाही अंधारात ठेवले. 

 ‘विलीनीकरणाचा डाव हाणून पाडला’

मगोप भाजपमध्ये विलीन करण्याचा डावही २0१२ पासून होता, असा आरोप करुन तो आम्ही हाणून पाडला, असे मामलेदार यांनी सांगितले. आता गोवा सुरक्षा मंच, शिवसेना, संघ, भाजपशी संबंधित लोकांना मगोपत प्रवेश दिला जात आहे. फोंड्यात केतन भाटीकर यांना प्रवेश दिला ते गेल्या विधानसभा निवडणुकीत गोसुमंचे पणजीतील उमेदवार होते. आता शिवसेनेचे शिवप्रसाद जोशी यांना पक्षात घेतले आहे. इतर पक्षातील लोकांना मगोपमध्ये प्रवेश देतानाही केंद्रीय समितीची परवानगी घेतलेली नाही. विलीनीकरणाचा डाव नेमका कोणाचा होता, असे विचारले असता मामलेदार यानी कोणाचे नाव घेतले नाही. ज्यांना या विलिनीकरणातून फायदा होणार होता त्यांचेच हे कारस्थान होते, असे ते म्हणाले. 

मगोपच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाची आॅफर आहे का, या प्रश्नावर तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. पक्षाध्यक्षांनी जे काही आरंभले आहे ते पाहता एक दिवस पक्ष संपून जाईल, तसे होऊ नये यासाठीच तोंड उघडावे लागले. पक्षातील अन्य पदाधिकारीही अध्यक्षांच्या कारभाराला कंटाळले आहेत,असाही दावा त्यांनी केला. ढवळीकर यांनी ‘लीडर’ बनून रहावे ‘डीलर’ नव्हे, असा खोचक सल्लाही मामलेदार यांनी दिला. 

दरम्यान, दीपक ढवळीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा आरोप केला की, मामलेदार यांचा काही विरोधक वापर करीत असून मगो पक्षात अस्थैर्य माजविण्याचा या विरोधकांचा डाव आहे. पर्रीकर यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप आघाडी सरकारला समर्थन देण्याचा निर्णय केंद्रीय समितीच्या सर्व सदस्यांच्या सहमतीने घेतला होता आणि यात कोणतेही ‘फ्रॉड’ नाही. ‘आम्ही मामलेदार यांची भेट घेऊन त्यांच्या मनात काही गैरसमज असतील तर दूर करु’, असे त्यांनी सांगितले. 

Web Title: The President of the Maharashtrawadi Gomantak Party in Goa is accused of Monopoly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.