सिद्धांत शिरोडकरना राष्ट्रपती पदक जाहीर; डिसोझा, वेर्णेकरना उत्कृष्ट सेवा पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2024 09:11 AM2024-01-26T09:11:07+5:302024-01-26T09:11:59+5:30
बुडणाऱ्या भावंडांना जीवदान देणाऱ्या साहिलचा होणार सन्मान
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : वाहतूक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांना उत्कृष्ट सेवेसाठी 'राष्ट्रपती सेवा पदक' जाहीर झाले आहे. तसेच एमटी विभागाचे पोलिस उपअधीक्षक विल्सन डिसोझा आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षक विभागाचे पोलिस उपअधीक्षक तुषार वेर्णेकर यांना 'उत्कृष्ट सेवा पदक' जाहीर करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २६ रोजी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात शिरोडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
देशभरात एकूण १,१३२ पोलिस, अग्निशमन दल, गृहरक्षक आणि नागरी सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रपती पदक १०२ जणांना तर ७५३ जणांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रपती पदकासाठी प्रत्येक राज्यातून अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली जाते. गोव्यातूनही त्याप्रमाणे शिफारस करण्यात येत असते.
दरम्यान, गोव्यातून पोलिस आणि अग्निशमन दलातील जवानांच्या नावाची यादी राष्ट्रपती पदकासाठी शिफारस केली जाते; परंतु गृहरक्षक दलाच्या जवानांची म्हणजेच होमगार्डची मात्र फार कमी वेळा शिफारस केली जात आहे. त्यामुळे गोव्यातील होमगार्डना क्वचितच राष्ट्रपती पदके जाहीर होतात.
'जी-२०' साठी आणि राष्ट्रीय स्पर्धेवेळी सुरक्षा व्यवस्थेत चांगली कामगिरी बजावल्यामुळे पोलिस अधीक्षक बोसुएट सिल्वा, किरण पोडुवाल, सुर्नीता सावंत यांच्यासह ११ अधिकाऱ्यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. इतर अधिकान्यांत सुचेता देसाई, उपअ- धीक्षक जिवबा दळवी, सिद्धांत शिरोडकर, प्रबोध शिरवईकर, मनोज म्हार्दोळकर, निरीक्षक जॉन फर्नाडिस, चेतन सावलेकर आणि दितेश नाईक यांचा समावेश आहे. गोवा विद्यापीठ मैदानावर २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात त्यांना ही प्रशस्तिपत्रे दिली जातील.
बुडणाऱ्या भावंडांना जीवदान देणाऱ्या साहिलचा होणार सन्मान
वाळपई येथील नाणूस- बेतकेकरवाड्यावरील साहिल भिसो लाड युवकाला राष्ट्रीय स्तरावरील 'उत्तम जीवन रक्षा पदक' जाहीर झाले आहे. म्हादई नदीत बुडणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना स्वतःचा जीव धोक्यात घालून साहिल याने जीवदान दिले. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन त्याचा सन्मान करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात त्याला हे पदक प्रदान करण्यात येणार आहे. ९ नोव्हेंबर २०२१ रोजी इम्रान (१३), रेहान (१०) आणि असिफ शेख (१६) ही तीन भावंडे आंघोळीसाठी नदीत उतरली होती. अचानक हे तिघेजण गटांगळ्या खाऊ लागल्याने १७ वर्षांच्या साहिलने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नदीत उडी घेत या तिघांना वाचविले. त्यामुळेच वाळपई येथील नागरिकांनी त्याला शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्याची विनंती राज्य सरकारकडे केली होती. आता त्याच्या या शौर्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव होणार आहे.
साहिलला राष्ट्रीय स्तरावरील 'उत्तम जीवन रक्षा पदक' जाहीर झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करताना मला आनंद होत आहे. आव्हानांनी भरलेल्या या जगात साहिलसारख्या युवकांनी दाखवलेले शौर्य हे इतरांसाठी प्रेरणादायी आहे. - विश्वजित राणे, नगर नियोजन मंत्री.