राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या गोव्यात, प्रथमच मुक्ती दिन सोहळ्यात सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 07:41 PM2020-12-18T19:41:31+5:302020-12-18T19:41:58+5:30
Ramnath Kovind : उद्या सायंकाळी पाच वाजता कांपाल येथील जिमखाना मैदानावर होणाऱ्या सोहळ्यास राष्ट्रपती उपस्थित राहतील.
पणजी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे उद्या शनिवारी दुपारी दीड वाजता गोव्यात सहकुटूंब आगमन होत आहे. गोव्याच्या साठाव्या मुक्तीदिन सोहळ्याचा आरंभ हा राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत केला जाणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता कांपाल येथील जिमखाना मैदानावर होणाऱ्या सोहळ्यास राष्ट्रपती उपस्थित राहतील. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी पणजीनगरी सजली आहे.
गोव्यात मुक्ती दिन सोहळ्यात यापूर्वी कधीच देशाचे राष्ट्रपती सहभागी होण्याची वेळ आली नव्हती. ती संधी उद्या येत आहे. सकाळी सरकारी पातळीवरून जो गोवा मुक्ती दिन सोहळा होईल, त्यावेळी राष्ट्रपती उपस्थित नसतील. तो कार्यक्रम वार्षिक पद्धतीनुसार होईल, पण सायंकाळी पाच वाजता राष्ट्रपती मुख्य सोहळ्यात भाषण करतील. राष्ट्रपती स्वत: पंचेचाळीस मिनिटे या सोहळ्यावेळी होणारा सांस्कृतिक कार्यक्रम पाहतील. गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन या सोहळ्यावेळी केले जाईल.
दुपारी गोव्यात आगमन झाल्यानंतर राष्ट्रपती राजभवनवर जातील. सायंकाळी जिमखाना मैदानावर येण्यापूर्वी ते येथील आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करतील. मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांच्यासोबत असतील.
राष्ट्रपती दोन दिवस गोव्यात असतील. ते वेर्णा येथील एका मंदिराला रविवारी भेट देतील. राष्ट्रपतींसोबत त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा, अनेक मान्यवर, अधिकारी मिळून चाळीस व्यक्तींचा ताफा दिल्लीहून गोव्यात येणार आहे. पणजीत त्याबाबतची तयारी सुरू आहे. पणजीतील वाहतूक व्यवस्थाही आज सायंकाळी बदलली जाणार आहे. पणजीत आज शुक्रवारी देखील वाहतूक कोंडी अनुभवास आली.