राष्ट्रपती दोन दिवसांच्या गोवा भेटीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 05:59 PM2020-12-19T17:59:50+5:302020-12-19T18:00:02+5:30
पणजी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दोन दिवसांच्या गोवा भेटीवर शनिवारी दुपारी आगमन झाले. गोवा मुक्ती दिन सोहळ्यात सायंकाळी राष्ट्रपतींनी भाग घेतला. पोर्तुगीजांच्या राजवटीतून गोवा मुक्त झाला, त्यास साठ वर्षे होत आहेत. यापूर्वी कधीच गोवा मुक्ती दिन सोहळ्यात सहभागी होण्याची संधी देशाच्या कुठल्याच राष्ट्रपतींना मिळाली नव्हती. कोविंद यांना ही संधी मिळाली. गोवा मुक्तीची साठ वर्षे वर्षभर साजरी करायची असे सरकारने ठरवले आहे. देशाच्या विविध शहरांमध्ये यापुढे गोवा मुक्तीचे कार्यक्रम होतील. गोव्याचा सांस्कृतिक वारसा, स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग व पर्यटनाची परंपरा हे सगळे देशासमोर मांडावे असा सरकारचा ...
पणजी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दोन दिवसांच्या गोवा भेटीवर शनिवारी दुपारी आगमन झाले. गोवा मुक्ती दिन सोहळ्यात सायंकाळी राष्ट्रपतींनी भाग घेतला.
पोर्तुगीजांच्या राजवटीतून गोवा मुक्त झाला, त्यास साठ वर्षे होत आहेत. यापूर्वी कधीच गोवा मुक्ती दिन सोहळ्यात सहभागी होण्याची संधी देशाच्या कुठल्याच राष्ट्रपतींना मिळाली नव्हती. कोविंद यांना ही संधी मिळाली. गोवा मुक्तीची साठ वर्षे वर्षभर साजरी करायची असे सरकारने ठरवले आहे. देशाच्या विविध शहरांमध्ये यापुढे गोवा मुक्तीचे कार्यक्रम होतील. गोव्याचा सांस्कृतिक वारसा, स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग व पर्यटनाची परंपरा हे सगळे देशासमोर मांडावे असा सरकारचा हेतू आहे.
राष्ट्रपती कोविंद हे त्यांच्या कुटूंबासह शनिवारी दाखल झाले, तेव्हा राज्यपाल कोशियारी व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. दाबोळी विमानतळावर राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो हेही उपस्थित राहिले. सायंकाळी राष्ट्रपतींनी गोवा मुक्तीच्या सोहळ्यात भाग घेतला. राष्ट्रपती रविवारीही गोव्यात असतील. त्यांचे काही खासगी कार्यक्रम रविवारी होतील. गोव्यातील विविध शिष्टमंडळेही राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना सामाजिक प्रश्नांविषयी निवेदने सादर करणार आहेत. राष्ट्रपती कोविंद हे दक्षिण गोव्यातील एका मंदिरालाही रविवारी भेट देतील. राष्ट्रपतींची पत्नी, मुलगा व मुलगीही गोवा भेटीवर आली आहे.
सरकारने पणजी शहर सजविले असून सर्वत्र रोषणाई केली आहे. प्रथमच मांडवी किनारी असलेला रेईश मागूश हा ऐतिहासिक किल्लाही सुशोभित करून रोषणाई करण्यात आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गोव्याला मुक्ती दिनानिमित्त शुभेच्या दिल्या.