राष्ट्रपतींचे गोव्यात २२ रोजी नागरी स्वागत; पदवीदान सोहळ्याला उपस्थिती लावणार
By किशोर कुबल | Published: August 18, 2023 03:21 PM2023-08-18T15:21:37+5:302023-08-18T15:21:45+5:30
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात संबोधणार
किशोर कुबल
पणजी : राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचा गोवा भेटीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या मंगळवारी २२ रोजी दुपारी ४.३० वाजता श्रीमती मुर्मू येथील आझाद मैदानावर हुतात्मा स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहतील. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता राजभवनवर दरबार हॉलमध्ये राष्ट्रपतींचे नागरी स्वागत केले जाईल.
बुधवारी २३ रोजी गोवा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यास महामहीम राष्ट्रपती उपस्थिती लावणार आहेत. सकाळी १० वाजता हा सोहळा होणार आहे,. त्यानंतर दुपारी ४ वाजता पर्वरी येथे विधानसभा संकुलात विधानसभेच्या विशेष अधिवेशनात श्रीमती मुर्मू संबोधणार आहेत.
देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून सुत्रे हाती घेतल्यानंतर श्रीमती मूर्मु यांची ही पहिलीच गोवा भेट आहे.
राष्ट्रपतींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकाय्रांनी येत्या २४ पर्यंत रजा घेऊ नये, असे आदेश कार्मिक खात्याने दिले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन श्रीमती मूर्मू यांच्या दौऱ्याच्या काळात सुरक्षा बंदोबस्ताविषयी चर्चा केली.