गोव्यात मद्यावरील करात कपात करण्यासाठी सरकारवर दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 12:33 PM2020-02-18T12:33:56+5:302020-02-18T12:34:57+5:30
मद्य व्यवसायिकांची प्रबळ लॉबीही सक्रिय झाली आहे व ही लॉबी आणि काही राजकारणी मद्यावरील ताजी करवाढ कर मागे घेतली जावी म्हणून सरकारवर दबाव आणू लागली आहे.
पणजी - फेणी, वाईन, बियरसह भारतीय बनावटीच्या विदेशी दारूवर गोवा सरकारने अलिकडेच करवाढ जाहीर केल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका चालवली आहे. सरकारमधील काही मंत्रीही निदान फेणीवर तरी कर नको अशी भूमिका मांडू लागले आहेत. मद्य व्यवसायिकांची प्रबळ लॉबीही सक्रिय झाली आहे व ही लॉबी आणि काही राजकारणी मद्यावरील ताजी करवाढ कर मागे घेतली जावी म्हणून सरकारवर दबाव आणू लागली आहे.
गोव्याला अबकारी क्षेत्रातून सुमारे साडे तीनशे ते चारशे कोटींचा वार्षिक महसुल मिळतो. गेल्या दोन वर्षात मद्य व्यवसायातून मिळणाऱ्या महसुलात वाढ झाली. तथापि, गोव्यात सध्या खनिज खाण बंदी असल्याने व सरकारच्या तिजोरीत अन्य कारणास्तवही महसुल कमी असल्याने गोवा सरकारने मद्यावरील करात बरीच वाढ केली. काही घटकांनी या वाढीचे स्वागतही केले. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी मद्यावरील कर वाढ ही योग्य असल्याची प्रतिक्रिया यापूर्वी प्रसार माध्यमांकडे व्यक्त केली. निदान दारू पिण्याचे प्रमाण तरी कमी होईल असे ते म्हणाले. मात्र गोव्यातील मद्य व्यवसायिकांच्या संघटनेने सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचा प्रचारच चालवला आहे.
काही मद्य व्यवसायिकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भेटून आपले म्हणणेही कळवले आहे. मद्यावरील करवाढ मागे घ्यावी, अन्यथा गोव्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होईल, अशी भूमिका काही मद्य व्यवसायिक मांडत आहेत. गोव्यात येणारा पर्यटक येथील मद्याचीही चव चाखतो. महागडी दारू पिण्यासाठी पर्यटक गोव्यात येणार नाहीत अशीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
सरकारमधील एक मंत्री मायकल लोबो यांनी फेणीवर कर नको अशी भूमिका नुकतीच मांडली. तसेच मद्यावरील करात थोडी कपात केली जायला हवी, असेही ते म्हणाले. फेणी व वाईनवर गोव्यात कधीच कर नव्हता. फेणी हे गोव्याचे हेरिटेज ड्रींक आहे व ते गोमंतकीयांकडूनच तयार केले जाते, त्यामुळे फेणीवरील कर मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा गोवा फॉरवर्ड पक्षाने दिला आहे.