मतदान करताना फोटो काढण्यासाठी दबाव; आमदार विजय सरदेसाईंची पोलिस ठाण्यात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2024 09:55 AM2024-05-08T09:55:39+5:302024-05-08T09:55:54+5:30
याप्रकरणी निवडणूक आयुक्ताकडे तक्रार करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : मतदारांवर दबाव टाकून मतदान करताना फोटो काढा, असे सांगितले जात असल्याची तक्रार घेऊन गोवा फॉरवर्डचे नेते, आमदार विजय सरदेसाई यांनी मंगळवारी फातोर्डा पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला नाही तर आपण याप्रकरणी निवडणूक आयुक्ताकडे तक्रार करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला.
पाजिफोड येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी फातोर्डा पोलिस ठाण्यात संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत काहीही सांगण्यास पोलिसांनी नकार दर्शविला. सरदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या महिला मतदाराचे नाव हजरत बी. असे आहे. आठ वर्षांपूर्वी त्यांना गोमेकॉत नोकरी मिळाली होती. तिला एका भाजप नेत्याने तुला बदली करून मडगावात आणतो, असे सांगून मतदान कुणाला केले हे फोटो काढून पाठव, असे सांगितले होते. फोटो काढताना तिला पकडण्यात आले. तिच्यावर दबाव टाकणारा भाजपचा हा नेता कोण? हे आम्हाला कळायला पाहिजे. त्यात एक मटकेवाला 'हुबळ्ळी'चा समावेश आहे. असे ते म्हणाले.
दिगंबर कामत मडगावातही असेच प्रकार करतात. फातोर्ड्यात आम्ही सतर्क असल्याने हा प्रकार उघडकीस आला, असे ते म्हणाले. त्या महिलेला पोलिसांनी सोडून दिले. असे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.