महाराष्ट्रातून होणारी बेकायदा खडी वाहतूक रोखली
By admin | Published: February 23, 2015 01:33 AM2015-02-23T01:33:16+5:302015-02-23T01:35:10+5:30
रावण सत्तरी : महाराष्ट्रातून गोव्यात होणारी बेकायदा खडी वाहतूक रविवारी सकाळी रावण, सत्तरी येथे रोखण्यात आली.
रावण सत्तरी : महाराष्ट्रातून गोव्यात होणारी बेकायदा खडी वाहतूक रविवारी सकाळी रावण, सत्तरी येथे रोखण्यात आली. तसेच खडी भरून आलेले ट्रक तिथेच खाली करून सोडण्यात आले. ही वाहतूक बंद न झाल्यास आलेला प्रत्येक ट्रक खाली करून सोडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
मागील तीन वर्षांपासून ही बेकायदा वाहतूक सुरू असून तळेखोल, दोडामार्ग (महाराष्ट्र) येथे असलेल्या खडी क्रशरवरून ही खडी बेकायदा रावण, पर्येमार्गे गोव्यातील विविध भागांत हलवण्यात येते. महाराष्ट्रातून गोव्यात खडी आणताना कोणताही कर सरकारला देण्यात येत नाही. तसेच महाराष्ट्रातून गोव्याला जोडणाऱ्या रावण, पर्ये या रस्त्यादरम्यान कुठेही चेकनाका नसल्याने गेल्या तीन वर्षांत हजारो ट्रक खडी या मार्गाने बेकायदा हलवण्यात आली आहे. यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडला आहे. तसेच या वाहतुकीमुळे रावण-पर्ये या रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाली असून सध्या रावण ते पर्ये दरम्यानच्या रहिवाशांना या वाहतुकीचा मनस्ताप सहन करावा लागतो. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावरून होणाऱ्या खडीने भरलेल्या ट्रकची भरधाव वाहतूक जीवावर बेतणारी असून या वाहतुकीमुळे ठिकठिकाणी रस्ता खचला आहे. तसेच धूळ प्रदूषण यामुळे नागरिक हैराण आहेत. या बेकायदा वाहतुकीविषयी गेल्या वर्षी डिचोली उपजिल्हाधिकारी, वाळपई मामलेदार, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग यांना निवेदन सादर करून याकडे लक्ष वेधले होते; परंतु पोलिसांनी विशेष कारवाई न केल्याने ही वाहतूक सुरूच होती.
दरम्यान, रविवारी सकाळी नागरिकांनी एकत्र येऊन रावण येथील देवळाजवळ महाराष्ट्रातून खडी भरून आलेले ट्रक अडवले व ट्रकचालकांकडे ट्रक व खडी क्रशरमालकाला पाचारण करावे, असा आग्रह धरला. मात्र, ट्रकमालक तसेच खडी क्रशरचालकाने या ठिकाणी येण्यास नकार दिल्याने खवळलेल्या नागरिकांनी खडी भरून आलेले ट्रक तिथेच खाली करून परत पाठवले. तसेच या पुढे एक जरी ट्रक
या रस्त्याने आल्यास तो पुढे सोडला जाणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
(खास प्रतिनिधी)