पंतप्रधान भेटीचा मुहूर्त सापडला, खाण अवलंबितांसोबत उद्या बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 08:09 PM2019-02-05T20:09:46+5:302019-02-05T20:10:08+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर गोव्यातील खनिज खाण अवलंबितांना भेट देण्यासाठी मुहूर्त सापडला. गोव्यातील मंत्री, आमदार, खासदारांसोबत खनिज खाण अवलंबितांच्या काही पुढाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी साडेनऊ वाजता भेटणार आहेत.
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर गोव्यातील खनिज खाण अवलंबितांना भेट देण्यासाठी मुहूर्त सापडला. गोव्यातील मंत्री, आमदार, खासदारांसोबत खनिज खाण अवलंबितांच्या काही पुढाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी साडेनऊ वाजता भेटणार आहेत.
भाजपाचे तिन्ही खासदार तसेच भाजपाचे मंत्री निलेश काब्राल, गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई, सभापती प्रमोद सावंत, मगोपचे आमदार दिपक प्रभू पाऊसकर हे पंतप्रधानांशी होणा-या बैठकीवेळी उपस्थित असतील. खाण अवलंबितांच्या संघटनेचे प्रमुख पुती गावकर तसेच अन्य काही अवलंबितांसोबत पंतप्रधानांची चर्चा होईल. खनिज खाणी लवकर सुरू केल्या जाव्यात अशी मागणी घेऊन खाण अवलंबितांनी गेले वर्षभर चळवळ चालवली आहे. खाण अवलंबितांचे नेते यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटले होते.
अमित शहा यांनी खनिज खाणी सुरू होण्याबाबत केंद्र सरकार तोडगा काढील व पुढील आठ दिवसांत तुम्हाला त्याची कल्पना येईल असे गेल्या महिन्यात पुती गावकर व इतरांना सांगितले होते पण काहीच तोडगा न निघाल्याने खाण अवलंबितांनी दि. 13 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली. तसेच गोव्याचे तिन्ही खासदार झोपलेले आहेत, अशीही टीका गावकर यांनी केली होती. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनाही यापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर खाणप्रश्न मांडताच आला नव्हता, कारण मोदी भेटीसाठी वेळच देत नव्हते.
अमित शहा यांची येत्या 9 रोजी गोव्यात सभा होत आहे. या पाश्र्वभूमीवर मोदी यांची भेट मिळायलाच हवी म्हणून प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व इतरांनी प्रयत्न केले. भेट निश्चित झाली असून मोदी नेमका कोणता उपाय सूचवतात ते ऐकण्याची उत्सुकता खाण अवलंबितांना आहे. कायदेशीर तोडगा काढण्याची ग्वाही यापूर्वी अमित शहा यांनी दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 88 खनिज लिजेस बंद केल्यापासून खनिज खाणी बंद आहेत.
ढवळीकर अनुपस्थित
मंत्री सुदिन ढवळीकर हे हैद्राबाद येथे वैद्यकीय तपासणीसाठी गेले आहेत. त्यामुळे ते बैठकीला पोहचू शकणार नाहीत, असे मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी सांगितले. गोव्याला साडेतीन हजार कोटींची मदत केंद्राने करावी व एकदा खाणी सुरू झाल्यानंतर मग केंद्राने टप्प्याटप्प्याने ही रक्कम वसुल करून घ्यावी, कारण हे साडेतीन हजार कोटी रुपये खाण बंदीच्या काळात खनिज अवलंबितांना मदत करण्यासाठी वापरता येतील असा मुद्दा यापूर्वी मंत्री ढवळीकर यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून मांडला आहे. या प्रस्तावाविषयी बुधवारी गोव्याचे खासदार, मंत्री, आमदारांनी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी दिपक ढवळीकर यांनी मंगळवारी केली.