गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ऑक्टोबरमध्ये - उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येणार
By किशोर कुबल | Published: April 26, 2023 04:48 PM2023-04-26T16:48:35+5:302023-04-26T16:48:44+5:30
३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा येत्या ऑक्टोबरमध्ये गोव्यात होणार असून उद्घाटन फातोर्डा स्टेडियमवर होईल.
पणजी : ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा येत्या ऑक्टोबरमध्ये गोव्यात होणार असून उद्घाटन फातोर्डा स्टेडियमवर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या उपलब्धतेनुसार उद्घाटनाची तारीख ठरविली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज स्पष्ट केले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी इंडियन ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी. टी. उषा शिक्षण मंडळाचे गोव्यात असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्याशी त्यांनी चर्चा करून आढावा घेतला.
मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात भरवण्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे. यापुढे गोवा क्रीडा पर्यटन क्षेत्र म्हणूनही विकसित होणार आहे. साधारणपणे २३ ते २५ ऑक्टोबर या दरम्यान उद्घाटन करण्याचा विचार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी उद्घाटनासाठी येतील. १० नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे या स्पर्धा चालतील त्यासाठी राज्यातील सर्व क्रीडा संघटनांना आम्ही सोबत घेतले असून या संघटना सहभागी होण्याची तयारी करत आहेत.
' लगोरी' खेळ समाविष्ट
गोव्याचा पारंपारिक ' लगोरी' खेळ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये समाविष्ट झाला आहे. गोमंतकीयांना या क्रीडा प्रकारात सहभागी होता येईल. गोव्यात केवळ आध्यात्मिक पर्यटनच नव्हे तर आता क्रीडा वातावरणही तयार होत असल्याने क्रीडा पर्यटनासाठी ही गोवा ओळखला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले की आयनमॅन आयोजनानंतर गोव्याच्या क्रीडा क्षेत्रात उत्साह वाढला आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी तयार केलेल्या पायाभूत सुविधा कालांतराने इतर क्रीडा स्पर्धांसाठी वापरता येतील. अलीकडेच गोव्यात जागतिक टेबल टेनिस स्पर्धा झाल्या. त्यात २२ राष्ट्रें सहभागी झाली होती.'
क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणाले की, ३८ क्रीडाप्रकार राष्ट्रीय स्पर्धांसाठी निश्चित झालेले आहेत. त्यांची ठिकाणेही ठरलेली आहेत. असोसिएशनच्या शिष्टमंडळासमोर सादरीकरण करण्यात आले. पायाभूत सुविधांची किरकोळ कामे बाकी आहेत. पेंटिंग, फरशा बसवणे आधी कामे येत्या १५ जुलै पर्यंत पूर्ण होतील. असोसिएशनच्या प्रतिनिधींनी पायाभूत सुविधांची पाहणी केली असून समाधान व्यक्त केलेले आहे.
पी. टी. उषा म्हणाल्या की दर दोन वर्षांनी आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होतील. यंदा या स्पर्धा गोव्यात होत आहेत याचा आनंद आहे. गोव्यातील पायाभूत सुविधांबद्दल आम्ही समाधानी आहोत.'
'एआयएफएफ'चे चौबे, अमिताभ शर्मा, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल आदी या प्रसंगी उपस्थित होते.