'दाबोळी'साठी प्रसंगी पंतप्रधानांचीही घेणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 01:18 PM2023-08-03T13:18:17+5:302023-08-03T13:20:15+5:30
दाबोळी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी नवीन इमारत, चार 'एरोब्रिज' आणि इतर विकास प्रकल्पांचे बांधकाम चालू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क वास्को: 'दाबोळी विमानतळ बंद होईल, अशी अफवा काही जणांकडून पसरवली जात आहे. मात्र, राज्यातील दाबोळी विमानतळ भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे एक महत्त्वाचे विमानतळ आहे. त्याच्या विकासासाठी प्राधिकरणातर्फे आणखी पावले उचलण्यात येणार आहेत. विधानसभा अधिवेशनानंतर मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री आणि मी दिल्लीला जाऊन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री, संरक्षण मंत्र्यांची भेट घेणार आहोत. गरज भासल्यास पंतप्रधानांनासुद्धा भेटू,' असे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.
दाबोळी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी नवीन इमारत, चार 'एरोब्रिज' आणि इतर विकास प्रकल्पांचे बांधकाम चालू आहे. विमानतळाला लागणाऱ्या वीज पुरवठ्याची गरज लक्षात ठेवून तेथे साकवाळ येथून आणलेल्या ३३ केव्ही भूमिगत वीज वाहिनीचे बुधवारी (दि २) मंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या समारंभाला आमदार संकल्प आमोणकर, आमदार कृष्णा साळकर, चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव, विमानतळ संचालक धनंजय राव, भाजप मंडळ अध्यक्ष संदीप सूद, प्रकाश गावस उपस्थित होते.
दाबोळी विमानतळ बंद होणार, असे सांगणारे फक्त अफवा पसरवत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'विमानतळावर प्रवाशांना आणखी उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विकासकामे चालू आहेत. वीज पुरवठ्याची गरज लक्षात ठेवून भारतीय विमानतळ प्राधिकरणाने भूमिगत वीज वाहिनी प्रकल्प आणला आहे. मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर तेथे नवीन मार्गावरील २३ नवीन विमानसेवा सुरू झाल्या. दाबोळी विमानतळावरील विमाने तेथे नेण्यात आलेली नाहीत. यात आणखी वाढ करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत.
पर्यटकांची वाढती संख्या पाहता, राज्याला दाबोळी आणि मोपा या दोन्ही विमानतळांची गरज आहे. दाबोळी बंद होणार, अशा अफवा कायमस्वरूपी बंद व्हाव्यात, यासाठी गरज पडल्यास पंतप्रधानांना भेटू, असे ते म्हणाले. आमदार संकल्प आमोणकर
आणि कृष्णा साळकर यांनीसुद्धा हे विमानतळ बंद होणार नाही, असे सांगितले. विमानतळ बंद होणार, अशा काहीजण अफवा पसरवत आहेत. जनतेने लक्ष देऊ नये, असे ते म्हणाले.
काम सुरु आहे
दाबोळीवरील जुनी टर्मिनल इमारत पाडल्यानंतर नवीन इमारत बांधण्याचे काम जोरात चालू आहे. जून महिन्यापर्यंत ते बांधकाम पूर्ण होईल. यानंतर दाबोळीवरून वार्षिक २ दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता वाढेल, असे दाबोळी विमानतळाचे संचालक धनंजय राव यांनी सांगितले. सध्या वर्षाला ११.३ दशलक्ष प्रवासी हाताळण्यात येतात. ही संख्या १३.३ दशलक्ष प्रवाशांपर्यंत वाढेल. विमानतळाबाहेर आणखी ९० चारचाकी पार्किंगची सुविधा वाढविली जाईल, असे ते म्हणाले.