जीसीएच्या कार्यालयावर छापा
By admin | Published: June 19, 2016 08:26 PM2016-06-19T20:26:04+5:302016-06-19T20:26:04+5:30
गोवा क्रिकेट संघटनेच्या (जीसीए) कार्यालयावर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून रविवारी छापा टाकण्यात आला.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 19 - गोवा क्रिकेट संघटनेच्या (जीसीए) कार्यालयावर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून रविवारी छापा टाकण्यात आला. या छाप्यात महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
जीसीएत 3 कोटी 13 लाख रुपयांच्या अफरातफर प्रकरणात अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद ऊर्फ बाळू फडके आणि खजिनदार अकबर मुल्ला यांना अटक केल्यावर जीसीएच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकून झाडाझडती घेतली. जीसीएच्या पर्वरी येथील दोन्ही नव्या आणि जुन्या इमारतींवर एकाच वेळी हा छापा टाकण्यात आला. या छाप्यातून काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. संशयितांना अटक करून आठवडा होत आला तरी त्यांच्या घरांची पोलिसांनी झडती घेतलेली नाही.
जे मुख्य पुरावे मिळविण्यासाठी हा छापा टाकला होता, ती जीसीएची इतिवृत्तांत वही मात्र पोलिसांच्या हाती लागली नाही. सर्वत्र शोधाशोध करूनही ती मिळाली नसल्याची माहिती सूत्रंकडून देण्यात आली. त्यामुळे हे छापासत्र चालूच राहणार असल्याचे संकेत असून, जीसीएच्या सदस्यांच्या घरीही छापे पडण्याची शक्यता आहे.
26 लाखांसाठी नोटीस बजावली होती; शेखर साळकर यांचा जबाब
जीसीएचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांचा जबाब पोलिसांनी रविवारी घेतला. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना पोलिसांनी केली होती. त्याप्रमाणे सकाळी 10.30 वाजता डॉ. साळकर आर्थिक गुन्हे विभागात हजर राहिले. त्यांचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला. त्यांनी जीसीएच्या पदाधिका-यांकडून आपल्याला पाठविलेल्या ई-मेल्ससंबंधी आणि त्यांना आपण पाठविलेल्या ई-मेल्ससंबंधी माहिती दिली. बेकायदा काढलेले 26 लाख रुपये व्याजासह परतफेड करण्यासाठी देसाई व फडके यांना आपण नोटीस बजावली होती, असे त्यांनी जबाबात म्हटले आहे.
आज महत्त्वाचे निवाडे
जीसीएच्या अटक केलेल्या संशयितांनी दाखल केलेल्या जामीन अर्जासंबंधी तिघा व्यक्तींनी सादर केलेली हरकत याचिका घ्यायची की नाही यावर आज, सोमवारी फैसला होणार आहे. हेमंत आंगले, विलास देसाई आणि प्रसाद फातर्पेकर या जीसीएच्या सदस्यांनी हे अर्ज केले आहेत. तसेच संशयितांकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात दाखल केलेल्या, जामीन अर्जावर सुनावणी घेऊन लवकर निवाडा देण्याची सूचना कनिष्ठ न्यायालयाला करण्याची मागणी करणा-या याचिकेवरही आज निवाडा होणार आहे.