‘जैका’वर छापा!
By admin | Published: July 23, 2015 02:02 AM2015-07-23T02:02:54+5:302015-07-23T02:03:06+5:30
पणजी : ६ कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात सीआयडी गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ‘जैका’च्या आल्तिनो येथील कार्यालयावर छापा घालून ‘जैका’
पणजी : ६ कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात सीआयडी गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ‘जैका’च्या आल्तिनो येथील कार्यालयावर छापा घालून ‘जैका’ प्रकल्पांच्या महत्त्वाच्या फाईल्स जप्त केल्या. ‘जैका’चे प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांना सोबत घेऊन दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अधिकाऱ्यांचे पथक आल्तिनो येथे धडकले. दोन पोलिसांना पहाऱ्यासाठी दरवाज्यात ठेवून आत झडती सुरू झाली. तब्बल ५ तास झडती चालली. उर्वरित कागदपत्रांबाबत खबरदारी
म्हणून जैकाच्या कार्यालयात दोन पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांच्या नेतृत्वाखाली गुन्हा शाखेचे निरीक्षक दत्तगुरू सावंत, निरीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई, निरीक्षक विश्वेश कर्पे, निरीक्षक वीरेंद्र वेळुस्कर आदी चार वरिष्ठ अधिकारी या पथकात सहभागी झाले होते. वेगवेगळ्या बांधकामांसंबंधीच्या सर्व महत्त्वाच्या फाईल्स तपासण्यात आल्या. मात्र, कार्यालयातील संगणक, लॅपटॉप किंवा हार्ड डिस्क यापैकी काहीही पोलिसांनी नेले नाही.
लाचखोरी झालीच : गर्ग
लाचखोरी झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याचे पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी सांगितले. या प्रकरणात एका किंवा एकापेक्षा जास्त मंत्र्यांवर गुन्हे नोंद होऊ शकतात, असे संकेतही त्यांनी दिले. ते म्हणाले की, तूर्त तपास प्राथमिक स्तरावर आहे. कालांतराने चौकशीत ज्यांची नावे पुढे येतील, तसे त्यांना बोलावले जाईल. अमेरिकन कोर्टाने दिलेला निवाडा तसेच हाती आलेल्या काही महत्त्वाच्या दस्तऐवजांवरून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यानंतर संशयितांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले जाईल. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी गरज पडल्यास इंटरपोल किंवा केंद्रीय विदेश व्यवहार मंत्रालयाचीही मदत घेतली जाईल, असेही
त्यांनी सांगितले.
चौकशीसाठी कोणाच्या कोठडीची गरज आहे का, असे विचारले असता सध्या तरी त्याबाबत एवढ्यात काही सांगणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात लाच देणारी लुईस बर्जर कंपनी किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांना आरोपी किंवा साक्षीदार करणार काय, असे विचारता सर्व पर्यायांची चाचपणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वाचासुंदर यांचा बुधवारीही जबाब घेण्यात आला. जगभर गाजत असलेल्या या लाच प्रकरणात सीआयडी गुन्हा शाखेने भादंसंच्या कलम १२0 (ब) (गुन्हेगारी संगनमत) व १९८८च्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १, ८, ९ व १३ खाली अज्ञात माजी मंत्री आणि लुईस बर्जर कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत.
(प्रतिनिधी)