जनतेच्या अपेक्षापूर्तीस प्राधान्य: मुख्यमंत्री, साखळीतील जनता दरबाराला मोठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2024 12:57 PM2024-02-05T12:57:20+5:302024-02-05T12:58:18+5:30
जनता दरबाराला दररोज चारशे-पाचशे लोक येतात.
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्य व केंद्र सरकारने प्रत्येक घरात समृद्धीचा ध्यास घेतला आहे. अनेक योजना, अनेक उपक्रम हाती घेत मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे या सरकारप्रती जनतेच्या अपेक्षा वाढत आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून साखळीत शनिवार-रविवार जनता दरबारात लोक मोठ्यासंख्येने उपस्थित राहतात. त्यांचे प्रश्न सोडवण्याला विशेष प्राधान्य असते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.
रविवारी सकाळी मुख्यमंत्री सावंत यांनी रवींद्र भवनमध्ये जनता दरबार आयोजित केला होता. ते शनिवारी रात्री दिल्ली दौऱ्यावरून परतले होते. जी कामे लोक घेवून येतात, त्यांचा शक्यतो त्याच ठिकाणी पाठपुरावा केला जातो. नोकरी, बदली, विकास कामे, तक्रारी, कौतुक, आर्थिक मदत त्याचबरोबर सोयरिक जुळवून देण्याची मागणी करणारे, नोकरीची ऑर्डर मिळालेलं लोक मिठाईदेखील घेवून येतात.
जनता दरबाराला दररोज चारशे-पाचशे लोक येतात. मात्र, मुख्यमंत्री जनता दरबार कधीही अर्ध्यावर लोकांना सोडत नाहीत. प्रत्येकाला भेटून त्यांचे प्रश्न समजून घेतात. त्यामुळे लोकांची अपेक्षा वाढत आहेत.
सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून वार्षिक अंदाज पत्रक सादर करणे, पंतप्रधान मोदी यांची मंगळवारी मडगावात होणारी सभा तसेच इतर अनेक कामत व्यस्त असूनही मुख्यमंत्री वेळ काढत असतात. रोज सकाळी आपल्या साखळीतील निवासस्थानी तासभर लोकांना भेटतात. राज्यातील शेकडो लोकांना कार्यकर्त्यांना ते नावाने ओळखतात त्यामुळे जनतेशी समरस झालेला मुख्यमंत्री अशी त्यांची ख्याती असल्याचे कालिदास गावस, कुंदन फळारी, तुळशीदास परब, भगवान हरमलकर यांनी सागितले. सहज उपलब्ध होणारा व लोकांच्या प्रती तळमळ असलेला मुख्यमंत्री अशी त्यांची कीर्ती असल्याचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले.
या संदर्भात मुख्यमंत्री सावंत यांना १८ तास काम करण्याची ऊर्जा कुठून येते असे विचारले असता ते म्हणाले, जनतेचे प्रेम व विकासाला मिळणारी चालना, प्रगतीच्या दिशेने असलेले मार्गक्रमण तसेच कार्यकर्ते लोकांबरोबर कायम मिसळणे, वावरत असतो हीच शक्ती आहे. मुख्यमंत्री खुर्ची मिळवण्यासाठी या पदावर नसून संपूर्ण गोमंतकीय जनतेच्या आशाआकाक्षा पूर्ण करणे, उत्तम प्रशासन, विकास साधने व 'आत्मनिर्भर स्वयंपूर्ण गोवा'चे स्वप्न साकारण्याचा ध्यास आहे. त्याला जनता, कार्यकर्त्यांची साथ मिळते हीच माझी शक्ती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सागितले.