गोव्यात खासगी बसमालकांचे 11 फेब्रुवारीला धरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 02:16 PM2019-02-05T14:16:52+5:302019-02-05T14:35:23+5:30
अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या 11 फेब्रुवारी रोजी जुन्ता हाऊसमधील वाहतूक खात्याच्या मुख्यालयासमोर धरणे आयोजित केले आहे.
पणजी - अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या 11 फेब्रुवारी रोजी जुन्ता हाऊसमधील वाहतूक खात्याच्या मुख्यालयासमोर धरणे आयोजित केले आहे. आठ दिवसात मागण्या मान्य न केल्यास आगामी विधानसभा पोट निवडणुकीत मांद्रे आणि शिरोडा या दोन्ही मतदारसंघात सत्ताधारी आघाडीच्या उमेदवाराविरोधात काम करण्याचा इशारा दिला आहे.
पत्रकार परिषदेत संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर म्हणाले की, 'गेले दीड वर्ष सरकारकडे बसमालकांच्या अनेक मागण्या पडून आहेत. वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई हे केवळ आश्वासने देतात, त्यापलीकडे काहीच करत नाहीत. सरकारने अलीकडे दिलेली तिकीट दरवाढ अन्यायकारक आहे. 12 किलोमीटर तसेच 18 किलोमीटर पल्ल्याच्या छोट्या मार्गावर खासगी बसमालकांना कोणताही फायदा झालेला नाही.
खासगी आणि कदंब बस गाड्यांच्या वेळापत्रकात ताळमेळ असावा तसेच संघर्ष होऊ नये यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली. परंतु या समितीच्या केवळ दोनच बैठका झालेल्या आहेत. प्रत्येक बस स्थानकावर आवश्यक त्या प्रमाणात घड्याळे लावण्याची विनंती करूनही ती पूर्ण झालेली नाही. सरकारच्या दोन योजना आहेत तसेच सबसिडी योजना आहे परंतु बस मालकांना याचा कोणताही लाभ 2014 पासून झालेला नाही. बँकांचे हप्ते थकले आहेत. तिकीट दरवाढीत संचालक देसाई यांनी जाणूनबुजून घातलेला आहे असा आरोपही ताम्हणकर यांनी केला.