खासगी कंपन्यांनी स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्यावे, आयटकचे नेते ॲड. ख्रिस्तोफर फोन्सेका यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 03:30 PM2024-05-24T15:30:43+5:302024-05-24T15:30:53+5:30
स्थानिक आमदार सरपंच, नगरसेवक तसेच सरकारने लक्ष घालणे गरजेचे आहे, असे ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉँग्रेसचे (आयटक) समन्वयक कामगार नेते ॲड. ख्रिस्तोफर फाेन्सेका यांनी सांगितले.
नारायण गावस
पणजी: गोवा औद्याेगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांनी प्रथम प्राधान्य हे स्थानिक युवकांना दिले पाहिजे. जर त्या क्षेत्रात स्थानिक कामगार मिळत नसेल तर परराज्यातील कामगारांना संधी दिली पाहिजे. यासाठी स्थानिक आमदार सरपंच, नगरसेवक तसेच सरकारने लक्ष घालणे गरजेचे आहे, असे ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉँग्रेसचे (आयटक) समन्वयक कामगार नेते ॲड. ख्रिस्तोफर फाेन्सेका यांनी सांगितले.
ॲड. ख्रिस्तोफर फाेन्सेका म्हणाले, खासगी कंपन्यांनी बाहेरील कामगार घेणे हा गुन्हा नाही, पण ज्या स्थानिक परिसरात या कंपन्या आहेत त्या भागातील लाेकांना अगोदर प्राधान्य दिले पाहिजे. आज गोवा औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्या आहेत. पण त्या नाेकर भरतीसाठी परराज्यात राेजगार मेळावे मुलाखती आयोजित करतात हे सरकारचे अपयश आहे. औद्योगिक विकास महामंडळ, राज्य उद्याेग मंडळ, केंद्र उद्याेग मंडळ यांनी याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. तसेच ज्या परिसरात या कंपन्या आहेत त्या परिसरातील स्थानिक आमदार, सरपंच, पंच सदस्यांनी याची दखल घेतली पाहिजे. जर त्या भागात बेराेजगार युवक असूनही कंपनी त्यांना राेजगार देत नसेल तर अशा कंपनीवर कारवाई केली पाहिजे.
ॲड. फोन्सेका म्हणाले, गोव्यात अनेक खासगी कंपन्या कामगारांना तुटपुंजा पगार देत आहेत. त्यामुळे ते कमी पगारात बाहेरील कामगारांना आणण्याचा प्रयत्न करतात. तसेच स्थानिक कामगारांची सतावणूक करतात. आम्ही गेली अनेक वर्षे कामगारांचा विषय लावून धरला आहे. फार्मा कंपनीमध्ये अनेक कामगारांची सतावणूक होत असते. त्यांना त्यांच्या समस्या मांडता येत नाही. आम्ही वेळोवेळी या कामगारांच्या समस्या उपस्थित करत असताे आतातरी सरकारने याची याेग्य दखल घ्यावी असे ते म्हणाले.