तिसऱ्या जिल्ह्याची प्रक्रिया सुरू; मुख्यमंत्र्यांची माहिती, विशेष समितीकडून सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2024 11:19 AM2024-08-03T11:19:22+5:302024-08-03T11:19:41+5:30
विशेष समितीने राज्यभर फिरुन सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यात तिसरा जिल्हा करण्याच्या प्रक्रियेला सरकारने सुरुवात केली आहे. यासाठी नियोजन आणि सांख्यिकी खात्यातंर्गत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती भौगोलिक गोष्टीचा आढावा घेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली.
विशेष समितीने राज्यभर फिरुन सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. तिसरा जिल्हा राज्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे, परंतु हे करताना केवळ एक किंवा दोन मुद्दे लक्षात घेऊन जिल्हा तयार करू शकत नाही. जिल्हा तयार करताना चारही बाजूने विचारा करावा लागतो. लोकसंख्या, आर्थिक व्यवस्था, प्रशासन, साधनसुविधा व लोकांची मते महत्वाची आहेत. तिसऱ्या जिल्ह्यामुळे लोकांचा विकास व्हावा हाच मुख्य हेतू आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. मागासवर्गीय लोकांच्या आधारे तिसरा जिल्हा अस्तित्वात यावा हे चुकिचे आहे. लोक मागासवर्गीय नाहीत तर तालुका मागासवर्गीय आहे. मागासवर्गीय म्हणजे जिथे बऱ्यापैकी साधनसुविधा नाहीत. तालुक्यासोबत लोकांचा विकास व्हावा हाच विचार आहे. येथे नवीन प्रशासकीय इमारत येणार आहे. समितीने एकदा अहवाल सादर केला की नंतर सर्व आमदारांना विश्वासात घेऊन पुढची वाटचाल ठरविण्यात येणार आहे, असेही डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले
फोंडा तिसरा जिल्हा करावा : गावकर
सावर्डेचे आमदार डॉ. गणेश गावकर यांनी शुक्रवारी अधिवेशनात तिसऱ्या जिल्ह्यासंदर्भात खासगी ठराव मांडला. यावेळी डॉ. गावकर यांनी सांगितले की, फोंडा, साखळी, प्रियोळ, शिरोडा, सावर्डे असे मतदारसंघ मिळून तिसरा जिल्हा करण्याचा सरकारचा विचार होता. तर फोंड्यात याचे मुख्यालय असणार आहे.
सभापतींना केपेत हवे तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय
आमदार डॉ. गणेश गावकर यांच्या ठरावाला पाठींबा देताना लेश काब्राल यांनी मात्र फोंड्यातील मुख्यालयाला विरोध केला, फोंडा जर मागासवर्गीय आहे तर आम्ही सुपर मागासवर्गीय आहोत. त्यामुळे केपे किंवा सावर्डेत याचे मुख्यालय व्हावे, अशी इच्छा व्यक्त्त केली. या चर्चेत सभापती रमेश तवडकर यांनी देखील भाग घेत काणकोण, केपे, सावर्डे मतदारसंघाचा हवा तसा विकास झालेला नाही. त्यामुळे तिसऱ्या जिल्ह्यात या मतदारसंघाचा विचार व्हायला हवा. तसेच केपे येथे मुख्यालय करावे, अशी सूचना केली.