कन्नड महासंघाकडून देशपांडेंचा निषेध
By admin | Published: April 18, 2015 02:36 AM2015-04-18T02:36:04+5:302015-04-18T02:36:15+5:30
वास्को : कर्नाटकाचे उच्च शिक्षणमंत्री आऱ व्ही़ देशपांडे यांनी गुरुवारी पणजीत बंगळुरू येथे असलेल्या गोमंतकीय नागरिकांबाबत केलेल्या वक्तव्याचा
वास्को : कर्नाटकाचे उच्च शिक्षणमंत्री आऱ व्ही़ देशपांडे यांनी गुरुवारी पणजीत बंगळुरू येथे असलेल्या गोमंतकीय नागरिकांबाबत केलेल्या वक्तव्याचा अखिल गोवा कन्नड महासंघातर्फे निषेध करण्यात आला आहे़ त्यांचे हे वक्तव्य आपले राजकीय स्थान बळकट करण्यासाठी राजकीय हेतूने प्रेरित असून शांतता बिघडवणारे आहे, असे महासंघाने म्हटले आहे.
अखिल गोवा कन्नड महासंघाचे अध्यक्ष सिदप्पा मेट्टी यांनी शुक्रवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे हा निषेध नोंदविला आहे़ गुरुवारी पणजीत देशपांडे यांनी, बंगळुरू येथे विविध आस्थापनांत सुमारे १० हजार गोमंतकीय नोकरीसाठी असून गोवा सरकारने बायणातील अवलंबितांचे पुनर्वसन न केल्यास या गोमंतकीयांना बंगळुरूतून हुसकावण्यात येईल, असा इशारा दिला होता़ शिक्षणमंत्री आऱ व्ही़ देशपांडे यांचे हे वक्तव्य गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधील संबंध बिघडण्यास कारणीभूत ठरेल. कर्नाटकातील आमदार ए़ एस़ पाटील यांनी गेली चार दशके गोव्यात राहणाऱ्या कायदेशीर घरमालकांना माणुसकीच्या दृष्टिकोनातून पुनर्वसनाचा लाभ मिळवून देण्यासाठी शांततापूर्ण धरणे आंदोलनास पाठिंबा दिलेला आहे़
आऱव्ही़ देशपांडे यांना जर गोव्यातील कन्नडिगांचा पुळका असेल, तर त्यांनी म्हादई कालव्याचे सुरू केलेले काम बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच कर्नाटकातील राजकीय नेत्यांनी समाजात कलह निर्माण करणारी अशा प्रकारची वक्तव्ये करण्याचे टाळावे, असे आवाहनही त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात केलेले आहे़
(प्रतिनिधी)