‘करमळी’त ‘किलबिल’साठी प्रकल्प
By admin | Published: September 6, 2014 01:24 AM2014-09-06T01:24:21+5:302014-09-06T01:24:29+5:30
पणजी : गोव्यातील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या करमळी तळ्यावर स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी वाढावी, या हेतूने कोकण रेल्वे महामंडळाने एक प्रकल्प हाती घेतला आहे.
पणजी : गोव्यातील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या करमळी तळ्यावर स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी वाढावी, या हेतूने कोकण रेल्वे महामंडळाने एक प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठीचा रोड मॅप तयार होऊन कार्यवाहीसुद्धा सुरू झाली आहे.
करमळी तळ्यावर मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी येत असतात. तथापि, रेल्वेस्थानकाच्या परिसरात दुतर्फा जर वृक्षराजी वाढविली व अधिकाधिक भाग हिरवागार केला, तर आणखी पक्षी तळ्यावर येतील, असे कोकण रेल्वे महामंडळाने गृहीत धरले आहे. महामंडळाने या कामासाठी सरकारच्या वन खात्याचीही मदत घेतली आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच प्रधान मुख्य वनपाल यांच्यात या दृष्टीने चर्चाही झाली आहे. एक-दोन बैठकाही पार पडल्या आहेत, अशी माहिती मिळाली.
करमळी रेल्वे स्थानक व करमळी तळे परिसरात कोकण रेल्वेकडून सध्या झाडे लावली जात आहेत. विविध मोसमांमध्ये फळे खाण्याच्या हेतूने पक्षी यावेत, असा विचार करून बदाम, आंबा, काजू, चिकूची झाडे लावली जात आहेत. त्यासाठी खास बांधकामही करण्यात आले आहे. एक विशिष्ट रचना केली आहे. ही माहिती कोकण रेल्वे महामंडळाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांच्याकडून मिळाली.
पक्षीप्रेमींसाठी एक केंद्र विकसित करावे आणि तळ्याच्या परिसरात लोकांना बसण्यासाठीची व्यवस्था सुधारावी, असेही ठरले आहे. हे काम पुढील टप्प्यात केले जाणार आहे.
(खास प्रतिनिधी)