किनारी भागांमध्ये दलालांचा सुळसुळाट; सरकार कारवाई करण्यात अपयशी, टीएमसीचा आरोप
By पूजा प्रभूगावकर | Published: April 26, 2023 06:29 PM2023-04-26T18:29:04+5:302023-04-26T18:30:39+5:30
राज्यातील किनारी भागांमध्ये दलालांचा सुळसुळाट आहे.
पणजी (गोवा) : राज्यातील किनारी भागांमध्ये दलालांचा सुळसुळाट आहे. मात्र वारंवार आश्वासन देऊनही या दलालांवर कारवाई होत नाही. सरकारचे हे अपयश असून सदर गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध असल्याचे तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत केली.
किनारी भागात सुरु असलेल्या दलालीवर पोलिस खाते निष्क्रीय असल्याचा आरोप एका मंत्र्यांनी केला होता. सदर मंत्र्याने केलेला हा आरोप खरा आहे ही खोटा यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही त्यांनी केली.
डिमेलो म्हणाले, की गोवा हे पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. मात्र किनारी भागांमध्ये दलाल मोठया संख्येने फोफावत आहे. सरकार केवळ कारवाईची भाषा बोलते, प्रत्यक्षात कारवाई मात्र होत नाही. पर्यटन मंत्री रोहन खवटे तर याविरोधात उघडपणे बोलत होत असून सरकारी यंत्रणेची सुध्दा हातमिळवणी असल्याचा आरोप त्यांनी केला होता.मग कारवाई होण्याएवजी दलालांची संख्या मात्र वाढतच आहेत. किनारी भागांमध्ये सुरु असलेल्या अशा बेकायदेशीर गोष्टींमुळे पर्यटकांना बराच त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला.