गोव्याच्या किनारपट्टीत परप्रांतीय बोगस दंत चिकित्सकांचा सुळसुळाट; पर्यटकांची लूट
By किशोर कुबल | Published: September 3, 2023 03:40 PM2023-09-03T15:40:03+5:302023-09-03T15:41:21+5:30
मुख्यमंत्री गरजले : तक्रार करा, एकेकावर कारवाई करतो
किशोर कुबल, पणजी : गोव्यात घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्के परप्रांतीय गुन्हेगार असतात असे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते. त्यानंतर आज असेच आणखी एक विधान करताना गोव्याच्या किनारी भागांमध्ये परप्रांतीय बोगस दंत चिकित्सकांनी दवाखाने उघडून विदेशी पर्यटकांची लूट चालवली असल्याचा खळबळजनक आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘याबाबतीत कोणीही पुढाकार घेऊन लेखी तक्रार केल्यास सरकार या बोगस डॉक्टरांविरुध्द कडक कारवाई करील.
येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित अखिल भारतीय दंत चिकित्सक संघटनेच्या गोवा शाखेच्या १८ च्या परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले कि, ‘गोव्याचे पर्यटन आता ‘सन, सॅण्ड अॅण्ड सी’ या पुरतेच मर्यादित राहिलेले नसून मेडिकल टुरिझमच्यादृष्टीनेही फोफावत आहे. याचाच फायदा काही परप्रांतीय बोगस दंत चिकित्सकांनी घेतला आहे. ते गोव्याच्या किनारी भागात दवाखाने थाटतात आणि विदेशी नागरिकांना लुटतात.’
मुख्यमंत्री म्हणाले की,‘ तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे., ही चिंतेची बाब आहे.
सरकारी दंत महाविद्यालयात निदान व उपचारांची सोय आहे. दंत चिकित्सकही ओरल कॅन्सरचे निदान करण्याबरोबरच रुग्णांचे समुपदेशन व उपचार याबाबतीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.’ मुख्यमंत्री म्हणाले की,‘कोविड महामारीच्या काळात सर्वात मोठे झळ दंत चिकित्सकांना बसली. डॉक्टरांनी पीपीई किट वगैरे घालून त्यावेळी शस्रक्रिया केल्या. दंत चिकित्सक माणसाच्या चेहय्रावर हास्य फुलविण्याचे महत्त्वाचे काम करत असतात. डॉक्टरांच्याही चेहय्रावर नेहमीच हास्य फुलले पाहिजे. सरकार दंत चिकित्सकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहे. दंत महाविद्यालयात अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाय्रांमध्ये ७० ते ८० टक्के महिला असतात ही उल्लेखनीय बाब आहे.’
संघटनेच्या गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. राजन लांबोर, मानद सचिव डॉ. ओंकार शेट्ये, आयोजन अध्यक्ष डॉ. फ्रान्सिस अक्कारा, सचिव डॉ. शाल्मली वीराज धोंड तसेच राज्यातील दंत चिकित्सक उपस्थित होते.