गोव्यात लवकरच इस्रायली तंत्रज्ञान कृषी केंद्र, सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 11:52 AM2019-06-21T11:52:57+5:302019-06-21T11:53:15+5:30
उपमुख्यमंत्र्यांनी अलीकडेच त्यांचे दोन सहकारी मंत्री विनोद पालयेंकर व जयेश साळगांवकर यांच्यासोबत इस्रायली दौरा केला होता
पणजी : इस्रायली तंत्रज्ञानाच्या आधारे गोव्यात लवकरच कृषी विषयक उत्कृष्ट असे केंद्र उघडण्यात येणार आहे. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणारे हे केंद्र असेल व पश्चिम आशियाई राष्ट्रांमधून अद्ययावत तंत्रज्ञान आणले जाईल. गोव्याच्या कृषी क्षेत्राला इस्रायली तंत्रज्ञानाची कास मिळाल्यास या क्षेत्राची भरभराट होईल असा सरकारचा दावा आहे.
उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी कृषीमंत्री या नात्याने माहिती देताना सांगितले की, मुंबईतील इस्रायली कोन्सुलेटचे उपप्रमुख निम्राड कोल्मार यांच्याशी या प्रश्नावर त्यांनी केली आहे. या बैठकीत कृषी विषयक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. शेतकऱ्यांनी पीक घेताना अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. भारत सरकारने अशा प्रकारची उत्कृष्ट केंद्रे उघडलेली आहेत आणि कृषी क्षेत्राला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड दिलेली आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी अलीकडेच त्यांचे दोन सहकारी मंत्री विनोद पालयेंकर व जयेश साळगांवकर यांच्यासोबत इस्रायली दौरा केला होता त्यावेळी तेथील सरकारशी कृषी, जलस्रोत व ग्रामीण विकास या प्रश्नांवर चर्चा केली होती.
दरम्यान, खरीप मोसमासाठी राज्यात २५0 टन भातबियाणी वितरित करण्यात आली आहेत. यावर्षी मान्सूनला विलंब झाल्याने बळीराजा चिंतेत होता परंतु काल गुरुवारी मान्सून दाखल झालेला असला तरी पाऊस मात्र नाही. वातावरण असेच राहिल्यास ‘लष्करी अळी’चा धोका आहे. कोंब फुटलेली बियाणी ही अळी नष्ट करु शकतात आणि त्याचा फटका शेतकºयांना बसू शकतो.
कृषी खात्याचे साहाय्यक संचालक पी. एम. मळीक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘जया, ज्योती या पारंपरिक भातबियाण्यांबरोबरच महाराष्ट्राचे ‘कर्जत-३’ आदी बियाणी सबसिडीवर वितरित केलेली आहेत. जीआरएस-१ हे सुमारे १३ टन नवीन बियाणे शेतकºयांना मोफत दिलेले आहे. या बियाण्याची खासियत म्हणजे ते खाजन जमिनी पुनरुज्जीवित करण्यास फार उपयुक्त ठरलेले आहे. खाजन जमिनींमधील शेतीसाठीच ते वापरता येईल.
इंडो-अमेरिकन बियाणी!
याशिवाय दोन प्रकारची इंडो अमेरिकन संकरित बियाणीही वितरित करण्यात आलेली आहेत. बंगळूरु येथून इंडेम ४00 - 00३ आणि इंडेम ४00 - 00४ ही बियाणी आणली असून एकूण ३४ टन भातबियाणी शेतकºयांना वितरित केलेली आहेत. गोवा बागायतदार संस्थेची वेगवेगळ्या ठिकाणी असलेली दालने, कृषी खात्याची विभागीय कार्यालये, पेडणे कृषी सोसायटी तसेच म्हापशातील कृषी बाजार दालनांमधून शेतकºयांना बियाण्यांची विक्री ५0 टक्के सब्सिडीवर केली जाते.
खरीप मोसमात राज्यभरात सुमारे ३१ हजार हेक्टर जमिनीत भाताची लागवड होते. लागवड क्षेत्र वाढविण्याचे लक्ष्य असून त्यासाठी वेगवेगळे उपक्रमही हाती घेतले जात आहेत.‘ज्योती’ या बियाण्याला पर्याय म्हणून केरळमधील लाल दाण्याची ‘कुंजुकुंजू’ आणि ‘माक्कम’ ही बियाणी आहेत. केरळच्या ‘रेवती’ बियाण्याची क्षमता सरासरी हेक्टरमागे ८ टनांपर्यंत पीक देण्याची आहे.