गोव्यात पुढील वर्षी फेब्रुवारीत जागतिक, सॅपेकटॅक्रो स्पर्धा भरविण्याचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 08:21 PM2018-04-02T20:21:37+5:302018-04-02T20:21:37+5:30
गोव्यात पुढील वर्षी फेब्रुवारी ७ ते १४ या दरम्यान जागतिक सॅपेकटॅक्रो स्पर्धा भरविण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी आज दोनापॉल येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममधील सोयी सुविधांची पाहणी आंतरराष्ट्रीय सॅपेकटॅक्रो महासंघाचे सरचिटणीस अब्दुल हलिम बीन कादर व त्यांच्या पथकाने केली. येथील सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पणजी : गोव्यात पुढील वर्षी फेब्रुवारी ७ ते १४ या दरम्यान जागतिक सॅपेकटॅक्रो स्पर्धा भरविण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी आज दोनापॉल येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममधील सोयी सुविधांची पाहणी आंतरराष्ट्रीय सॅपेकटॅक्रो महासंघाचे सरचिटणीस अब्दुल हलिम बीन कादर व त्यांच्या पथकाने केली. येथील सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ही जागतिक चषक स्पर्धा भरविण्यासाठी चीन, मंगोलिया, इराण हे देशही शर्यतीत आहेत.
अखिल भारतीय सॅपेक टॅक्रो महासंघाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष या नात्याने बोलताना विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले की, गोव्यात ही स्पर्धा भरविण्याची पूर्ण क्षमता आहे. त्यासाठी आवश्यक सोयी-सुविधाही ब-यापैकी येथे आहेत. क्रीडामंत्री बाबू आजगांवकर यांनी या स्पर्धेला सरकारतर्फ आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची हमी दिली आहे.
कादर म्हणाले की, कमीत कमी ३ हजार आसन क्षमता, दिव्यांची पुरेशी व्यवस्था तसेच एकूणच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा जागतिक स्पर्धा भरविण्यासाठी लागतात. त्यादृष्टिने दोनापॉल येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम परिपूर्ण आहे. या स्टेडियममध्ये तीन भागात या स्पर्धा खेळवल्या जाऊ शकतात.
भारतात आणि गोव्यातही सॅपेकटॅक्रो खेळाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. आशियाई सॅपेकटॅक्रो स्पर्धेत भारताच्या पथकाला पदक मिळाले. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये या खेळाचा मोठा इव्हेंट झाला तेथेही भारतीय संघाने चमक दाखवली. २0१९ साली होऊ घातलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १६ ते २0 देश सहभागी होतील. सिंगापूरसह जपान, चीन, कंबोडिया, इंडोनेशिया, श्रीलंका, भारत आदी देश या खेळाबद्दल विशेष अभिरुची दाखवत आहेत.
भारतीय सॅपेक टॅक्रो महासंघाचे सरचिटणीस योगेंद्र दहिया म्हणाले की, गोवा सरकारने वेळोवेळी या खेळासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. येथील सोयी, सुविधांची आम्ही पाहणी केली असून त्या समाधानकारक आहेत. क्रीडा खात्याचे संचालक व्ही. एम. प्रभूदेसाई यांनीही चांगले सहकार्य दिले आहे. मिरामार किना-यावर चार ते पाच देशांमधील संघांना निमंत्रित करुन सॅपेक टॅक्रो खेळाची प्रात्यक्षिकेही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय सॅपेक टॅक्रो संघटनेचे सचिव सुरज देसाई तसेच इतर पदाधिकारी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.