पवनचक्क्यांसाठी इच्छा प्रस्ताव मागवले; १०० मेगावॅट वीज निर्मिती करणार
By किशोर कुबल | Published: February 15, 2024 04:58 PM2024-02-15T16:58:42+5:302024-02-15T16:59:24+5:30
विंड टर्बाइनचे उत्पादक किंवा विकासक असलेल्या इच्छुक कंपन्यांकडून इच्छा प्रस्ताव मागवले आहेत.
किशोर कुबल, पणजी : पवन ऊर्जा निर्मिती केंद्र बनण्याच्या उद्देशाने, गोवा सरकारने राज्यात १०० मेगावॅट व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाइन प्रकल्प उभारण्यासाठी पावले उचलली आहेत.
गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (गेडा)ने दीर्घकालीन वीज खरेदीसाठी गोव्यात व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाइन वापरून पवनचक्की आधारित वीज प्रकल्प उभारण्यासाठी विंड टर्बाइनचे उत्पादक किंवा विकासक असलेल्या इच्छुक कंपन्यांकडून इच्छा प्रस्ताव मागवले आहेत.
शंभर मेगावॅट पवन वीज निर्मिती प्रकल्पांची किंमत सातशे कोटींहून अधिक आहे. राज्य सरकारने परिकल्पित केलेल्या प्रकल्पाच्या मुख्य व्याप्तीमध्ये व्हर्टिकल ॲक्सिस विंड प्रोजेक्टचा विकास, जवळच्या उपकेंद्रापर्यंत इव्हॅक्युएशन इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास आणि गोवा विद्युत विभागाला व्युत्पन्न विजेची विक्री यांचा समावेश आहे. विकासकाने सरकारला ३० वर्षे वीज पुरवठा करावा लागेल.
गोव्यात दरडोई वीज वापर राष्ट्रीय सरासरीच्या दुप्पट :
दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये, गोव्याचा दरडोई वीज वापर राष्ट्रीय सरासरीच्या दुप्पट होत आहे, २०१९-२१ या काळात ग्राहकांची संख्या, वीज विक्री व विजेचा जोडलेला भार वाढला आहे. नोव्हेंबर २०२२ च्या केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, गोव्याची एकूण स्थापित वीज क्षमता ७४.७९ मेगावॅट होती. पैकी २६.७९ मेगावॅट ही अक्षय ऊर्जा स्त्रोतांकडून आणि ४८ मेगावॅट गॅस पॉवर प्रकल्पांमधून होती.