महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या भूमिकेवरून गोव्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 05:37 AM2017-10-23T05:37:28+5:302017-10-23T05:37:40+5:30
केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) आम्ही घटक नाही, अशी भूमिका महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने घेतल्यामुळे गोव्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
पणजी : केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) आम्ही घटक नाही, अशी भूमिका महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने घेतल्यामुळे गोव्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. पर्रीकर सरकारमध्ये घटक असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाने या भूमिकेला आक्षेप घेतला आहे.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे मंत्री विजय सरदेसाई म्हणतात की, मगोप हा जुना पक्ष आहे. वयोमानाप्रमाणे एखाद्याला विस्मरण होते. तसे असेल तर दिल्लीत आम्ही भाजपाबरोबर रालोआत एकत्र आहोत याचे स्मरण मगोपला करून द्यावे लागेल. या अनुषंगाने सरदेसाई यांनी गेल्या एप्रिलमधील सर्व घटक पक्षांच्या दिल्लीवारीचा व तेव्हा रालोआच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या होर्डिंगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर मगोपचे सर्वेसर्वा बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर व स्वत: आपला अशा तिघांच्या फोटोंचाही उल्लेख केला आहे. रालोआत मगोप घटक नव्हता, तर रालोआच्या होर्डिंगवर ढवळीकर यांचा फोटो कसा, असा सवाल सरदेसाई यांनी केला आहे.
>मगोपच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक सोमवारी होत असून २0१९ची लोकसभा निवडणूक पक्षाने स्वतंत्रपणे लढवावी की नाही, हा विषयी होणार आहे. पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मगोप रालोआचा घटक नसल्याचा पुनरुच्चार केला.
>सोमवारी होत असलेल्या केंद्रीय समितीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत ठराव घेतला जाण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता ‘गरज भासेल तेव्हा त्याबाबत बघू,’ असे उत्तर ढवळीकर यांनी दिले.