भरती प्रक्रिया लांबल्याने भावी शिक्षक वैतागले; १४२ उमेदवार प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 10:24 AM2023-09-22T10:24:46+5:302023-09-22T10:25:09+5:30
डिसेंबरपर्यंत निर्णय लागण्याची शक्यता.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : शिक्षण खात्याकडून प्राथमिक शिक्षक भरती करण्याबाबत डिसेंबर २०२१ मध्ये जाहिरात दिली होती. राज्यभरात शिक्षकांच्या १४२ पदांसाठी प्राथमिक शिक्षण खात्याने ही जाहिरात दिली होती. अर्जदार उमेदवारांची लेखी परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्यांची नावे शिक्षण खात्याने जारी केली होती. पण, आता शिक्षकांना सेवेत रुजू करून घेण्यासाठी आणखी दीड ते दोन महिने लागणार आहेत. त्यामुळे ही भरती ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
निकाल लागून आता महिने उलटले आहेत. तरीही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या शिक्षकांच्या पदांच्या अगोदर याच खात्यात आलेली कारकून पदे भरली जाणार असल्याची महिती मिळाली आहे. राज्यात सध्या शिक्षकांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने लवकरात लवकर ही पदे भरणेही गरजेचे आहे. पण, अजूनही याचे सोपस्कार पूर्ण झालेले नाहीत.
परीक्षा कधी झाली?
शिक्षण खात्याने २०२१ मध्ये जाहिरात दिली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्याने गेल्या वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये या उमेदवारांच्या लेखी परीक्षा घेण्यात आल्या. त्यानंतर लेखी परीक्षेचा निकाल जारी झाला. मात्र, आता तीन महिने उलटले तरी पुढील प्रक्रिया न झाल्यामुळे उमेदवारांत नाराजीचा सूर आहे.
स्वप्नपूर्तीपासून एक पाऊल दूर
पात्र उमेदवारांनी मोठ्या उमेदीने अर्ज केले होते. मेहनतीने परीक्षाही उत्तीर्ण झाले आहेत. पण, खात्याने तांत्रिक अडचणीमुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर ठेवली आहे. त्यामुळे काही भावी शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही मोठ्या अडचणीवर मात करून परीक्षा दिल्या आहेत. सरकारने आता हलगर्जीपणा न करता पारदर्शकपणे योग्य उमेदवारांची भरती करावी, असे काही उमेदवारांनी सांगितले.
का रखडली भरती?
भरती लवकर करण्यासाठी काय अडचण येत आहे हेही अजून शिक्षण खात्याने स्पष्ट केलेली नाही. या पदांसोबत कारकून तसेच इतर पदेही रिक्त आहेत. शिक्षकांची पदे खूप आहेत. त्यामुळे अर्जांची योग्य छाननी होणे गरजेचे आहे. तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे ही भरती प्रक्रिया पुढे गेली आहे. ती लवकरच भरली जाणार आहे, असेही खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.