से कॅथेड्रलसह ओल्ड गोव्यातील पाच वास्तूंना वीज विरोधी यंत्रणेचे संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 05:10 PM2019-03-01T17:10:07+5:302019-03-01T17:11:00+5:30

आशियातील सर्वात मोठे चर्च अशी मान्यता मिळविलेल्या आणि पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात ओल्ड गोवा येथे उभारलेल्या से कॅथेड्रल चर्चचा 35 मीटर उंच असलेला उत्तर भागातील टॉवर 1776 साली पावसात विजेच्या तडाख्याने कोसळल्याने तो पुन्हा उभारणे शक्य झालेच नाही.

Protection of the anti-power system from five buildings in Old Goa with cathedral church | से कॅथेड्रलसह ओल्ड गोव्यातील पाच वास्तूंना वीज विरोधी यंत्रणेचे संरक्षण

से कॅथेड्रलसह ओल्ड गोव्यातील पाच वास्तूंना वीज विरोधी यंत्रणेचे संरक्षण

googlenewsNext

मडगाव: आशियातील सर्वात मोठे चर्च अशी मान्यता मिळविलेल्या आणि पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात ओल्ड गोवा येथे उभारलेल्या से कॅथेड्रल चर्चचा 35 मीटर उंच असलेला उत्तर भागातील टॉवर 1776 साली पावसात विजेच्या तडाख्याने कोसळल्याने तो पुन्हा उभारणे शक्य झालेच नाही. 2014 सालीही पुन्हा एकदा या टॉवरला विजेचा तडाखा बसला. मात्र सुदैवाने या तडाख्यात फारशी मोठी हानी झाली नाही. भविष्यात पुन्हा एकदा अशा ऐतिहासिक वास्तूंवर असा नैसर्गिक प्रकोप होऊ नये यासाठी आता आर्केलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (एएसआय) खात्याने खबरदारी घेतली असून, ओल्ड गोव्यातील पाच महत्त्वाच्या वास्तूंवर वीज प्रतिबंधक यंत्रणा उभारली आहे.

या आर्केलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडून गोव्यात 21 ऐतिहासिक वास्तूंची देखभाल केली जात असून त्यातील सेंट आगुस्तीन टॉवर, अवर लेडी ऑफ रोझरी चर्च, बॉम जिझस बाजिलिका, सेंट कॅजिटन्स चर्च आणि से कॅथेड्रल चर्च या पाच वास्तूंचा समावेश आहे. 
एएसआय गोवाचे सहाय्यक पुराण वास्तू अधीक्षक उदय शास्त्री यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या यंत्रणोमुळे या वारसा वास्तूंच्या 80 मीटर परिधात विजेच्या तडाख्यापासून संरक्षण मिळणार असून प्रत्येकी साडेचार लाखांची अशा सात यंत्रणा बसविल्या असून त्याचा एकंदर खर्च 1.1 कोटी एवढा आहे.

शास्त्री म्हणाले, अशा ऐतिहासिक वास्तूंना पावसाळ्यात वीज कोसळल्याने धोका निर्माण होऊ शकतो. मात्र या यंत्रणेमुळे विजेच्या तडाख्याचा प्रभाव कमी होत असल्याने वास्तूची पडझड होत नाही. एएसआयच्या अन्य एका अधिका-याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, ताजमहाल आणि दक्षिण भारतातील प्रसिद्ध मंदिरांत अशी यंत्रणा उभारली आहे. मात्र ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी या यंत्रणेची गरज नाही असे ते म्हणाले. ही नवीन यंत्रणा जुन्या तांब्याच्या तारेच्या यंत्रणेपेक्षा अधिक सक्षम असून त्यामुळेच विजेच्या तडाख्याचा प्रभाव कमी होतो, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

विजेच्या तडाख्यामुळे ऐतिहासिक वास्तूंची कशी दारुण पडझड होऊ शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण ओल्ड गोव्यातच आहे. याच भागात पूर्वीच्या काळी 46 मीटर उंचीचा सेंट आगुस्तीन टॉवर उभा होता. याच वास्तूला जोडून देखणे चर्च आणि कॉन्व्हेंटही होते. मात्र या टॉवरवर वीज कोसळल्याने आज तेथे केवळ त्याचे अवशेषच उभे आहेत. यावरून या वीज विरोधी यंत्रणोचे महत्त्व कुणाच्याही लक्षात यावे.
युनोस्कोच्या जागतिक वारसा प्रकल्पाच्या सूचित येत असलेल्या ओल्ड गोव्यातील या देखण्या चर्चला पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येत असतात. या चर्चच्या देखणेपणामुळे त्या संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. ओल्ड गोवा हे गोव्यात मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे उत्तर गोवा तसेच दक्षिण गोव्यात येणारे पर्यटक या प्रकल्पांना न चुकता भेट देतच असतात.

Web Title: Protection of the anti-power system from five buildings in Old Goa with cathedral church

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.