मडगाव : रेल्वे मार्ग विस्तारीकरणाला विरोध, पहाटे 5 वाजेपर्यंत रुळावर ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 12:25 PM2020-11-02T12:25:09+5:302020-11-02T12:26:54+5:30
आंदोलकांनी बंद पाडले काम, हजारोंच्या संख्येने चांदर येथे लोक जमा
मडगाव :रेल्वे दुपदरीकरणाला विरोध करणाऱ्या हजारो आंदोलकांनी पहाटे 5 वाजेपर्यंत चांदर येथे रेल्वे रुळावर ठाण मांडून आपल्या एकीचे प्रदर्शन केले. आंदोलकांचा हा रुद्रावतार पाहून रेल्वेने शेवटी आपले नियोजित काम बंद ठेवणेच पसंत केले.
रविवारी रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत रेल्वे मार्गाच्या विस्ताराचे काम रेल्वेने हाती घेतले होते. मात्र हा विस्तार कोळसा वाहतुकीसाठी असल्याचा दावा करून ' गोयांत कोळसो नाका' या संघटनेने शनिवारी या विस्ताराला विरोध करण्यासाठी चलो चांदरची हाक दिली होती.
या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी रात्री हजारोंच्या संख्येने लोक चांदर येथे जमले. चांदर चर्च पासून लोकांनी मेणबत्ती मोर्चा काढला. यावेळी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. काही आंदोलक ढोल घेऊनही या आंदोलनात सामील झाले होते. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आप या राजकीय पक्षानीही या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला होता. त्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यानीही या आंदोलनात भाग घेतला होता.
या आंदोलनाचे नेते अभिजित प्रभुदेसाई यांनी हा प्रतिसाद अभूतपूर्व असून आता तरी सरकारने लोकभावनेची कदर करून कोळसा वाहतुकीला पोषक असलेले सर्व प्रकल्प गुंडाळून ठेवावेत, असे आवाहन केले.