गोमंतकीयांची दिल्लीत निदर्शने; पण नेमके कारण काय? जाणून घ्या, सविस्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2023 08:51 AM2023-03-20T08:51:23+5:302023-03-20T08:51:45+5:30
युनेस्को वारसास्थळाची मान्यता काढून घेण्याची भीती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: जुने गोवे येथे वारसास्थळाजवळील बेकायदेशीर बंगला जमीनदोस्त करा, अशी मागणी करीत राज्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच पर्यावरणप्रेमींनी दिल्ली येथील जंतरमंतर येथे रविवारी धरणे आंदोलन केले.
जुने गोवे येथील वारसास्थळात असलेल्या या बेकायदेशीर बंगल्यावर कारवाई करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे आंदोलन आहे. त्या बंगल्यावर कारवाई होईपर्यंत विविध माध्यमांतून आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला.
याप्रसंगी आम आदमी पक्षाच्या नेत्या अॅड. प्रतिमा कुतिन्हो, गोवा फॉरवर्डचे नेते विकास भगत, तृणमूल काँग्रेस गोवाचे नेते तसेच शंकर पोळजी, सय्यद इम्तियाज, अँथनी डिसिल्वा, ग्लेन काब्राल व इतरांनी हे धरणे आंदोलन केले. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जुने गोवे येथील सेंट केजिटन चर्च परिसरात उभारलेल्या या बंगल्याचा विषय मागील दोन वर्षांपासून गाजत आहे. याविरोधात स्थानिकांनी तसेच पर्यावरणप्रेमींनी वेळोवेळी आंदोलनही केले. त्या बंगल्यामुळे वारसास्थळ धोक्यात आले आहे. यामुळे युनेस्को वारसास्थळाची मान्यता काढून घेण्याची भीती आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या नियमांनुसार वारसास्थळ परिसर हा बफर झोन म्हणून गृहीत धरला जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"