गरजेनुसार २४ तासांत सुविधा पुरवा, क्रीडा मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
By समीर नाईक | Published: October 22, 2023 04:41 PM2023-10-22T16:41:16+5:302023-10-22T16:41:34+5:30
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठीच्या बहुतांश पायाभूत सुविधांची पूर्तता झाली आहे.
पणजी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठीच्या बहुतांश पायाभूत सुविधांची पूर्तता झाली आहे. आता अखेरच्या क्षणी लागणाऱ्या सोयीसुविधा व साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आम्ही बहुतांश कामे पूर्ण केली आहेत. क्रीडापटूंसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
गुरुवारी (दि. २६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा होईल. स्पर्धेतील बॅडमिंटनसह काही क्रीडा स्पर्धा आधीच सुरू झाल्या आहेत. आता स्पर्धेतील पुढील सामने ज्या - ज्या ठिकाणी होणार आहेत, तेथे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी भेट देऊन तयारीचा आढावा घेत आहेत. स्पर्धेच्या ठिकाणची तयारी कितपत झाली आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. जेथे वैयक्तिक खेळांच्या स्पर्धा होणार आहेत, तेथे पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याची खात्री मंत्र्यांनी करून घेतली.
काही ठिकाणी तातडीने सुविधांची पुर्तता व्हावी यासाठी निर्णय घेण्याची गरज असल्याने मी व्यक्तिश: क्रीडा स्पर्धांच्या ठिकाणांना भेटी देत आहे. सर्व अडचणी तत्काळ दूर करण्यात येत आहेत, सर्व कामे पूर्णत्वास आली आहेत, असे गावडे म्हणाले.
स्पर्धेच्या तयारीकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीदेखील लक्ष ठेवले आहे. राज्य सरकार २००९ पासून स्पर्धेच्या आयोजनासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील होते. आणि आता ती वेळ आली आहे. आम्हाला अजून पुढे जायचे आहे. ज्या-त्या स्थळांवर प्रत्यक्ष स्पर्धा सुरू होण्यापूर्वी २४ तास आधी सर्व प्रकारची तयारी पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित प्रमुखांना देण्यात आले आहेत असेही गावडे यांनी सांगितले.