गोमंतकीयांना अयोध्येसाठी रेल्वे उपलब्ध करून देऊ; सदानंद तानावडे यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 08:10 AM2024-01-08T08:10:03+5:302024-01-08T08:10:53+5:30
मडगावात 'चलो अयोध्या' कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव: २५ जानेवारी ते २५ फेब्रुवारीपर्यंत गोव्यातील लोकांना अयोध्येत रामांचे दर्शन घेण्यासाठी रेल्वे उपलब्ध करणार, अशी घोषणा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केली. मडगावात झालेल्या चलो अयोध्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर स्वामी ब्रहोशानंद, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, मडगावचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, वास्कोचे आमदार दाजी साळकर, फातोर्डाचे माजी आमदार दामोदर नाईक, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
ब्रहोशानंद म्हणाले, हिंदू समाजाने एकत्रित येऊन नव्या पिढीला संस्काराचे शिक्षण मंदिरांतून द्यावे. रामाचे अस्तित्व नाही, रामसेतू नाही... अशा अफवा पसरवल्या जातात. मात्र, राम हे आदर्श राजा होते. ते कोणाच्याही विरोधात नव्हते. काहींनी रामाच्या नावाने सत्तेच्या वापर केला. राम सर्वांचे आहेत. त्यांचा आदर्श सर्वांनी आचरणात आणावा. रामांना शरण जायला हवे. नारीशक्ती जवळ संस्कृती टिकवण्याची जबाबदारी आहे, म्हणून नारीला पहिला मान दिला जातो. आज मंदिरांचे स्वरूप बदलले आहे. केवळ मोठ्या जत्रा, लाइट तर काही मंदिरांसमोर जुगार खेळला जातो, हे चुकीचे आहे. कोणी कोणाचा धर्म बदलू शकत नाही. देव सर्वांत श्रेष्ठ आहे, असे धर्म सांगतो. २२ जानेवारी रोजी सर्वांनी मंदिरात उपस्थित राहून पूजा करावी, असेही आवाहन त्यांनी केले.
मनुष्य हा केंद्रबिंदू मानून सर्वानी सुखी जगावे सर्व हिंदूनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.