मुख्यमंत्र्यांच्याहस्ते दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर स्कूटर, संवाद साधने प्रदान
By समीर नाईक | Published: July 18, 2024 03:43 PM2024-07-18T15:43:45+5:302024-07-18T15:44:18+5:30
पणजी: राज्यातील दिव्यांग व्यक्तींना आधार व चांगली साधनसुविधा देण्याच्या प्रयत्नात, हिंदूस्तान पेट्रोलियम कंपनी लिमीटेडने (एचपीसीएल) आपल्या महारत्न या उपक्रमांतगंत ...
पणजी: राज्यातील दिव्यांग व्यक्तींना आधार व चांगली साधनसुविधा देण्याच्या प्रयत्नात, हिंदूस्तान पेट्रोलियम कंपनी लिमीटेडने (एचपीसीएल) आपल्या महारत्न या उपक्रमांतगंत ३२ दिव्यांगाचे जीवनमान उंचावण्यासाठी दिव्यांगयुक्त व्हीलचेअर स्कूटर, आणि संवाद साधने प्रदान केली. यातून त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ आणि परिपूर्ण बनणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमाेद सावंत यांच्याहस्ते स्कूटर व इतर गोष्टी प्रदान करण्यात आल्या.
पर्वरी येथील विधानसभेत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत सभापती रमेश तवडकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार दिगंबर कामत, दिव्यांगजण सक्षमीकरण विभागाचे सचिव ई. वालवन, संचालक वर्षा नाईक, राज्य दिव्यांगजन आयोगाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, सचिव ताहा हाजिक, संजय स्कूलचे अध्यक्ष सिध्दार्थ कुंकळकर व एचपीसीएलचे कार्यकारी संचालक राजीव गोयल व इतर अधिकारी उपस्थित होते. राज्य दिव्यांगजन आयोग कार्यालय, व दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग यांच्या सहाय्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या दरम्यान १० नियो मोशन बाईक्स, १० लोवर फ्लोर बाईक्स, व १२ संवाद साधने दिव्यांगांना प्रदान करण्यात आले. एचपीसीएल आपला ५० वा स्थापना दिवस साजरा करत आहे, याचे औचित्य साधून त्यांनी हा कार्यक्रम हाती घेतला होता. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण काळजी, समुदाय विकास इत्यादींना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांद्वारे समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देत व्यवसायाचा विस्तार करण्यात ते यशस्वी झाले आहे.
आम्ही वर्षभरात विविध उपक्रम दिव्यांगजनांसाठी आयोजित केले आहेत. पर्पल फेस्टमुळे आमच्या कार्याला गती मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याची दखल घेतली. आता आम्ही एचपीसीएल अंतर्गत दिव्यांगांसाठी आवश्यक स्कूटर व उपयुक्त साधने प्रदान केले. यापूर्वी बीपीसीएलने ३०० कृत्रीम हात व पाय वाटप केले होते. खास दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग तयार करुन दिव्यांगासाठी काम केले जात आहे. सामान्य लोकांना मिळणारी सुविधा दिव्यांगजनांना मिळावी, हेच आमचे मुख्य ध्येय आहे, असे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी यावेळी सांगितले.