‘पीटीएस’ भ्रष्टाचार चौकशीचा नवा पेच...
By admin | Published: May 21, 2015 01:29 AM2015-05-21T01:29:40+5:302015-05-21T01:29:49+5:30
पणजी : वाळपई येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील (पीटीएस) कथित भ्रष्टाचार प्रकरणात उपमहानिरीक्षकस्तरीय तपासाचा अहवाल अगोदर जाहीर झाल्यामुळे
पणजी : वाळपई येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील (पीटीएस)
कथित भ्रष्टाचार प्रकरणात उपमहानिरीक्षकस्तरीय तपासाचा अहवाल अगोदर जाहीर झाल्यामुळे
याच प्रकरणाचा सुरू असलेल्या उपअधीक्षकस्तरीय तपासकामावर तणाव येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या ज्येष्ठ अधिकाऱ्याशी कनिष्ठ अधिकारी विसंगत अहवाल देण्याची शक्यता कमीच आहे.
पीटीएसमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणाचे एकाच वेळी पोलीस मुख्यालयातून व भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून असे दोन तपास अधिकाऱ्यांकडून स्वतंत्रपणे तपास काम चालू होते. मुख्यालयातून पोलीस उपमहानिरीक्षक व्ही. रंगानाथन तपास करीत होते, तर भ्रष्टाचार विरोधी पथकाचे उपअधीक्षक बॉसुएट सिल्वा स्वतंत्रपणे तपास करीत आहेत. उपमहानिरीक्षक व्ही. रेंगानाथन यांनी तपास पूर्ण करून अहवाल सादर केला. या अहवालात पीटीएसमधील काही अनियमितपणांवर बोट ठेवले आहे; परंतु घोटाळा नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता याच प्रकरणात उपअधीक्षक बॉसुएट सिल्वा यांचा तपास अहवाल काय म्हणतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरले आहे; कारण तो पीटीएसवर ठपका ठेवणारा अहवाल ठरला, तर तो आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी विसंगत ठरणार आहे. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी विसंगत अहवाल दिल्याचा प्रकार अद्याप तरी पोलीस खात्याच्या नोंदीत नाही. त्यामुळे या तपास प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथक काही प्रमाणात तरी तणावाखाली आल्याचे जाणवत आहे.
प्रशिक्षणार्थींसाठी सुरू असलेल्या वाळपई येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या कँटीनमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा असल्याचे तसेच प्रशिक्षणार्थींकडून मोठ्या प्रमाणावर विविध कारणांवरून पैसे उकळण्याची तक्रार ‘जनरेशन नेक्स्ट’ या बिगर सरकारी संस्थेकडून करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलीस महासंचालक टी. मोहन यांनी चौकशीचा आदेश दिला होता. त्यापूर्वी या प्रकरणाची एसीबीकडूनही चौकशी सुरू होती.
(प्रतिनिधी)