पुलवामा अतिरेकी हल्ल्याचा गोव्यातही निषेध, अभाविप, शिवसेनेकडून निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 09:38 PM2019-02-15T21:38:53+5:302019-02-15T21:39:14+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे जवानांवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा गोव्यात अभाविप आणि शिवसेनेने निदर्शने करीत जोरदार निषेध केला.
पणजी : जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे जवानांवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा गोव्यात अभाविप आणि शिवसेनेने निदर्शने करीत जोरदार निषेध केला. अभाविपने येथील कदंब स्थानकावर निषेध सभा घेऊन जैश ए मोहम्मद संघटनेच्या अतिरेक्याचा पुतळा जाळला आणि शाहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दहशतवादाचे समूळ निर्मूलन करण्याची मागणी या प्रसंगी वक्त्यांनी केली.
पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात ४४ सीआरपीएफ जवान शाहीद झाले. अभाविपचे विद्यार्थी नेते संकल्प फळदेसाई, अभिदीप देसाई, ऋषिकेश शेटगांवकर, सौरभ बोरकर, पूजन प्रिओळकर, प्रभा नाईक यांनी भाषणाद्वारे आपल्या संवेदना व्यक्त केल्या. पाकिस्तानचा बचाव करण्यासाठी धावणारे नवज्योत सिद्धू तसेच फारुख अब्दुल्ला याचा निषेध करण्यात अभाविपने निषेध केला. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करुन दहशतवादाचे समूळ निर्मूलन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, शिवसेनेने शिवोली येथे निषेध सभा घेतली. मेणबत्ती मोर्चा काढून निषेध करण्यात आला तसेच आत्मघातकी दहशतवाद्याचा पुतळा जाळण्यात आला. या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा काळ आता आलेला आहे, असे शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत म्हणाले. आजकाल युवक पैशांच्या हव्यासापोटी दहशतवादाकडे वळतान की अन्य काही कारणांमुळे याची चौकशी केली जावी. भारतातील अशा युवकांना हाताशी धरुनच दहशतवादी हल्ले घडवून आणले जात आहेत ही चिंतेची बाब आहे, असे ते म्हणाले.