राष्ट्रीय हरित लवादाची पुणे शाखा गोमंतकियांसाठी बंद, 11 ऑक्टोबरला निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 01:17 PM2017-10-04T13:17:08+5:302017-10-04T13:17:44+5:30
राष्ट्रीय हरित लवादाची पुणे शाखा गोमंतकियांसाठी बंद करण्याच्या प्रकरणातील न्यायालयीन लढाई संपली असून मुंबई उच्च न्यायालयाचे पणजी खंडपीठ या प्रकरणात 11 ऑक्टोबर रोजी निवाडा सुनावणार आहे.
पणजीः राष्ट्रीय हरित लवादाची पुणे शाखा गोमंतकियांसाठी बंद करण्याच्या प्रकरणातील न्यायालयीन लढाई संपली असून मुंबई उच्च न्यायालयाचे पणजी खंडपीठ या प्रकरणात 11 ऑक्टोबर रोजी निवाडा सुनावणार आहे.
राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे शाखेची दारे गोमंतकियांसाठी बंद करून ती दिल्लीला नेण्याच्या प्रकरणात याचिकादार आणि सरकार अशा उभय पक्षांचे म्हणणे न्या. गौतम पटेल आणि नूतन साखरदांडे यांच्या खंडपीठाने एेकून घेतले. हे प्रकरण खंडपीठाने स्वेच्छा याचिका दाखल करून घेतले होते. तसेच लवादापुढे दावे सादर करणाऱ्या याचिकादरांनाही त्यात सामावून घेतले होते.
सरकारचे म्हणणे होते की गोव्याहून दिल्लीला थेट विमाने असल्यामुळे ते सरकारी अधिकाऱ्यांसाठी सोयिस्कर होते. त्या तुलनेत गोव्याहून पुण्याला कमी उड्डाणे आहेत असे म्हटले होते. दिल्ली परवडत नसल्याचे याचिकादारांचे म्हणणे आहे. लवाद दिल्लीला नेण्यासाठी विनंती क रण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केल्यामुळेच तसा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केवळ सरकारला सोयिस्कर होणे एवढ्याच निष्कर्षावर लवाद पुणेहून दिल्लाला हलविण्यात आले आहे काय? लवादापुढे दावे करणाऱ्यांना पुणे सोयीचे होत नाही असे या याचिकाकर्त्यांनी सरकारला सांगितले होते काय? याचिकादार विमानाने प्रवास करतात हे तुम्ही खात्रीने सांगू शकता काय असे प्रश्नही खुद्द न्यायालयाकडून सरकार पक्षाला विचारण्यात आले होते. 11 रोजी होणाऱ्या निवाड्यावर सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे.