निरोगी राहण्याचा सल्ला देत नागपुरातील डॉक्टरांनी सायकलवरून केला पुणे-गोवा दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 02:10 PM2017-12-01T14:10:11+5:302017-12-01T14:10:23+5:30
म्हापसा- सायकल चालवा निरोगी व तंदुरुस्त राहा. तसेच आपला परिसर प्रदूषण मुक्त ठेऊन स्वच्छतेला हातभारा लावा, असा संदेश देत नागपुरातील पाच डॉक्टरांनी पुणे ते गोवा असा सहा दिवस सायकलवरुन दौरा केला. पाच दिवसात या डॉक्टरांनी सायकलीवरुन ५८६ किलोमीटर खडतर असा कोकण मार्गे प्रवास करुन हा संदेश लोकापर्यंत पोहोचवला.
दर दिवशी साधारण १०० किलोमीटर प्रवास या डॉक्टरांनी केला. सर्वात जास्त प्रवास ११० किलोमीटरचा ठरला. तर सर्वात कमी प्रवास शेवटच्या दिवशी आज कुडाळवरुन गोव्यापर्यंतचा ६४ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. गोव्यात दाखल झाल्यानंतर त्यांच्या सहा दिवसाच्या दौऱ्यावरील थकवा आल्याचे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून जाणवत नव्हते.
मूळ नागपुरात स्वतंत्र व्यवसाय करणाºया या डॉक्टरांनी आपला दौरा पुण्यातून सुरु केला. व्यवसायाने डॉक्टर असून सुद्धा आज धावपळीच्या जीवनात आपल्याला निरोगी राहण्यासाठी सायकल चालवण्याचा संदेश देऊ शकतो तर समाजातील प्रत्येक घटकाला निरोगी राहण्यासाठी हे करणे सहज व सोपी गोष्ट असल्याचे मत सायकलवरुन गोवा दौरा केलेल्या डॉक्टरांनी व्यक्त केले.
रविवारी पहाटे सुरु झालेल्या त्यांच्या या प्रवासाची सांगता शुक्रवारी सकाळी म्हापसा पालिकेच्या कार्यालया समोर झाली. त्यावेळी म्हापसा पालिकेचे नगराध्यक्ष रोहन कवळेकर तसेच नगरसेवक तुषार टोपले, राजसिंग राणे, रायन ब्रागांझा, फ्रॅन्की कार्व्हालो यांनी पुष्पगुच्छ देऊन उस्फूर्त स्वागत केले. डॉक्टरांनी हाती घेतलेला हा उपक्रम स्तुतीस पात्र असल्याचे मत कवळेकर यांनी त्यांचे स्वागत करताना व्यक्त केले.
पाच डॉक्टरांच्या या पथकात काही सर्जन तर काही फिजीशीयन्स आहेत. त्यात एक महिला तर चार पुरुष डॉक्टरांचा समावेश होता. यात डॉ. राजेश सिंघवी, डॉ. धनंजय बोकारे, डॉ. किरण बेलसरे, डॉ. अनुपमा बेलसरे, डॉ. शैलेश निसळ तसेच त्यांच्या पत्नी डॉ. रम्या निसळ यांचा त्यात समावेश होता.
वाटेत सहायता करण्यासाठी गाडीची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली; पण सामान ठेवण्यापलिकडे तसेच गरजेच्या वस्तू घेण्यापलिकडे त्याचा फारसा उपयोग या डॉक्टरांना झाला नाही. प्रवासादरम्यान वाटेत वेगवेगळे अनुभव आले. विविध विचारसरणीतल्या लोकांशी त्यांची चर्चा झाली. असे असले तरी स्वच्छतेबद्दल लोकात निर्माण झालेली जागृती लक्ष वेधून घेण्यासारखी होती अशी माहिती डॉ. शैलेश निसळ यांनी दिली. प्रवासा दरम्यान पाहिलेली मंदिरे तसेच इतर अनेक स्थळे लोकांकडून स्वच्छ ठेवण्यात आल्याचे दिसून आले. रस्त्याच्या बाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ दिसून आला. त्यामुळे स्वच्छते संदर्भात लोकांत जागृती झाल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचे ते म्हणाले.
नागपुरातून हे डॉक्टर शुक्रवारी पुण्यात दाखल झाले. तेथे गोवा दौरा करण्यासाठी सायकली मिळवल्यानंतर पुण्यावरुन तामीळघाट त्यांनी गाठला व तेथून नंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. तामीळघाटावरुन हे डॉक्टर रायगडला आले. सुरुवातीचा हा प्रवास बराच खडतर झाल्याची माहिती डॉ. शैलेश निसळ यांनी दिली. वाटेत अनेक ठिकाणी हातात सायकली घेऊन प्रवास करावा लागला.
रायगड किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर तेथे असलेल्या शिवाजी महाराजांच्या स्मृतीकडे पाहून मनाला समाधान वाटले तसेच सर्व शिण निघून गेल्याची माहिती डॉ. शैलेश निसळ यांनी दिला. सुरुवातीच्या खडतर प्रवासानंतर पुढील प्रवास चांगला झाल्याचे ते म्हणाले. रायगड वरुन दापोली असा १०० किलोमीटरचा प्रवास केला. दापोलीवरुन नंतर गणपतीपुळे असा प्रवास त्यांनी केला. गणपतीपुळेला गणपतीचे दर्शन घेऊन त्या रात्री तेथे वास्तव्य केल्यानंतर पुढील प्रवास किनारी भागातून सुरु झाला. गणपतीपुळेवरुन पडेल व पडेल येथून नंतर कुडाळ असा कोकणातील किनारी भागातून प्रवासाचा शेवटचा टप्पा पूर्ण केला. काल रात्री कुडाळला पोहचल्यानंतर आज सकाळी पहाटे ६.३० वाजता गोवा प्रवासाला सुरुवात केली व ६२ किलोमीटरचा हा शेवटचा टप्पा पाच तासात सकाळी ११.३० वाजता पूर्ण केला व त्यांनी उत्तर गोव्यातील म्हापसा शहर गाठले.
प्रवासात किरकोळ त्रास वगळता मोठा त्रास जाणवला नसल्याची माहिती डॉ. रमा निसळ यांनी सांगितले. सायकल पंक्चर होण्याच्या घटना वाटेत घडल्या. तसेच पथकातील एका डॉक्टरला झालेला किरकोळ अपघात प्रवासात कोणताच त्रास जाणवला नसल्याचे डॉ. रमा निसळ म्हणाल्या. निसर्ग रम्य अशा गोव्यात दाखल झाल्यानंतर मनाला प्रसन्नता वाटली. पुढील काही दिवस गोव्यात वास्तव्य करणार असल्याची माहिती यावेळी दिली.