अखंडीत वीज सेवा मिळावी हा उद्देश; गोव्यात आपचे वीज आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 06:01 PM2020-11-26T18:01:27+5:302020-11-26T18:01:38+5:30
गोमंतकीयांना सरकारने प्रति महिना दोनशे युनीटपर्यंत मोफत वीज द्यावी असे आवाहन आम्ही करत असल्याचे आपचे नेते वाल्मिकी नायक यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
पणजी : दिल्लीत आम आदमी पक्ष लोकांना अखंडीत आणि स्वस्त वीज उपलब्ध करून देतो. त्याच धर्तीवर गोव्यातही गोवा सरकारकडून अखंडीत व स्वस्त वीज उपलब्ध करून मिळावी म्हणून आम आदमी पक्षाने वीज आंदोलन तथा अभियान सुरू केले आहे. गुरुवारी येथे याबाबतची घोषणा करण्यात आली.
गोमंतकीयांना सरकारने प्रति महिना दोनशे युनीटपर्यंत मोफत वीज द्यावी असे आवाहन आम्ही करत असल्याचे आपचे नेते वाल्मिकी नायक यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. या अभियाना दरम्यान आपकडून राज्यात दोनशे कोपरा बैठका घेतल्या जातील. तसेच बाजारपेठांमध्ये व घरोघर जाऊन आपचे कार्यकर्ते अभियान राबवतील. वीजेच्या विषयावर आपकडून जनमत कौलही घेतला जाणार आहे. ७५०४७५०४७५ या क्रमांकावर मिस कॉल देऊनही लोक जनमत कौलामध्ये सहभागी होऊ शकतील. गोमंतकीयांना खंडीत वीज समस्येपासून तत्काळ मुक्ती हवी आहे काय, गोवेकरांना दोनशे युनीटपर्यंत मोफत वीज व चारशे युनीटपर्यंत पन्नास टक्के वीज दर कपात हवी आहे काय असे प्रश्न अभियानावेळी व जनमत कौलावेळी विचारले जातील.
अखंडीत वीज पुरवठा मिळावा हा गोमंतकीयांचा हक्क आहे. दिल्लीमध्ये घरगुती वापरासाठी प्रति महिना दोनशे युनीटपर्यंत जे लोक वीजेचा वापर करतात, त्यांना वीज पूर्ण मोफत आहे. जे दोनशे ते चारशे युनीटपर्यंत वीजेचा वापर करतात, त्यांना दिल्लीत वीज बिलामध्ये पन्नास टक्के सुट मिळते. गोमंतकीयांंनी त्यांच्या दिल्लीतील नातेवाईक व मित्रांकडून दिल्लीतील वीज मॉडेलबाबत माहिती घ्यावी व गोव्यातील वीज मॉडेलशी त्याची तुलना करावी असे आपचे निमंत्रक राहुल म्हांब्रे व वाल्मिकी नायक म्हणाले. गोव्यात भाजप जरी नऊ वर्षे सत्तेत असला तरी, भाजप सरकार गोमंतकीयांना अखंडीत वीज देण्यात अपयशी ठरले हे वीज मंत्री निलेश काब्राल यांनी चर्चात्मक कार्यक्रमावेळी मान्य केल्याचे वाल्मिकी नायक म्हणाले.