मतदानाची टक्केवारी वाढीसाठी जोर लावा; विनोद तावडे यांनी व्यावसायिकांशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2024 01:03 PM2024-04-26T13:03:42+5:302024-04-26T13:04:59+5:30
पर्वरी येथे विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांसोबत संवादात्मक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तावडे बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : आगामी लोकसभेची निवडणूक ही देशाचा नेता निवडीसाठी आहे, हे लक्षात घेऊन मतदान होण्याची आवश्यकता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात कमी झालेली टक्केवारी चिंताजनक आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी केली आहे.
पर्वरी येथे विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांसोबत संवादात्मक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तावडे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्यसभेचे खासदार प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, राज्य प्रभारी आशिश सूद, खासदार श्रीपाद नाईक, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, दामू नाईक उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात कमी झालेल्या टक्केवारीची दोन कारणे आहेत. वाढलेले तापमान, तसेच केंद्रात मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार हे मतदारांनी गृहीत धरल्याने मतदानापासून ते दूर राहिले आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी मतदानाची टक्केवारी कशी वाढवता येईल, याची दक्षता घ्या, अशी सूचना तावडे यांनी यावेळी केली.
यावेळी डॉ. सुनील यांनी आपली सूचना मांडताना जगभरात वाढलेल्या तणावामुळे मानसीक आजार हा इतर आजारांच्या तुलनेत पहिल्या क्रमांकाचा आजार झाला आहे. त्यामुळे मानसोपचाराचा समावेश विमा योजनेंतर्गत करण्यात यावा, अशी सूचना मांडली. रोजगाराच्या उद्देशाने नागरिक देशभरात स्थलांतर करीत असतात. व्यवसायिकांना मनुष्यबळ (कामगार) मिळणे मुष्कील होत आहे. अशा लोकांच्या हितासाठी तसेच त्यांना योग्य रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने विशेष केंद्र स्थापन करावे, अशी सूचना निलेश गुप्ता यांनी केली.
डॉ. अविनाथ कांदे यांनी युवा पिढीला योग्य दिशा देण्यासाठी पावले उचलण्याची सूचना केली. मंत्री रोहन खंवटे यांनी यावेळी आपले विचार मांडले. दामू नाईक यांनी आभार प्रदर्शन केले. किशोर अस्नोडकर यांनी सूत्रसंचालन केले
दुहेरी नागरिकत्वावर तोडगा काढावा
कास्तोलीनो यांनी दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला. बऱ्याच गोमंतकीयांनी पोर्तुगीज पासपोर्ट मिळविल्याने त्यांच्यावर भारतीय नागरिकत्व गमावण्याची पाळी आली आहे. ते मूळ भारतीय असल्याने देशावर त्यांचे प्रेम आहे. आजही बरेच लोक भारतात वास्तव करून राहतात. त्यांच्या हितासाठी त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी पावले उचलण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी तावडे यांनी विदेश मंत्रालयाच्यावतीने त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी पावले उचलण्याचे आश्वासन त्यांना दिले.