सरकारवर दबावासाठी धरणे
By admin | Published: September 7, 2014 01:07 AM2014-09-07T01:07:36+5:302014-09-07T01:07:36+5:30
पणजी : सरकार खाण व्यवसाय नव्याने सुरू व्हावा म्हणून जोरदार प्रयत्न करताना दिसत नाही. सारे काही संथ गतीने चालले आहे.
पणजी : सरकार खाण व्यवसाय नव्याने सुरू व्हावा म्हणून जोरदार प्रयत्न करताना दिसत नाही. सारे काही संथ गतीने चालले आहे. यामुळे दबाव निर्माण करत सरकारला इशारा देण्यासाठी राज्यातील खाण अवलंबितांनी येत्या मंगळवारी पणजीत लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे.
गोंयचा मायनिंग लोकांचो मंचचे निमंत्रक अॅड. सुहास नाईक व कामगार नेते राजू मंगेशकर यांनी याविषयी शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गोवा सरकारने खाण व्यवसाय निलंबित केल्याच्या घटनेस येत्या मंगळवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने खाण बंदी उठवूनही पाच महिन्यांचा काळ लोटला, तरी राज्य सरकारने निलंबन मागे घेतलेले नाही. यामुळे खाणींवर काम करणारे सुमारे पाच हजार कर्मचारी अडचणीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी खाण व्यवसाय सुरू व्हावा म्हणून कष्ट घेतले; पण सध्या सरकार उत्साहाने व जोरात काही करत आहे असे दिसत नाही. सहा महिन्यांत अहवाल द्या, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते; पण पाच महिने झाले, तरी सरकार पुन्हा न्यायालयाकडे गेलेले नाही, असे मंगेशकर म्हणाले.
सरकारने लोकांच्या भावनांशी खेळू नये. १५ सप्टेंबरपर्यंत खाण लिज नूतनीकरण धोरण जाहीर करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. पंधरा तारीख येण्यास अवघेच दिवस शिल्लक आहेत. आॅक्टोबरमध्ये लिज नूतनीकरण करून दिले जाईल, असेही सांगण्यात आले होते. सरकारच्या कामाची सध्याची गती जर पाहिली, तर पुढील सहा महिने खाणी सुरू होणार नाहीत. सरकारने वेग वाढवावा व निर्णायक भूमिका घ्यावी, असा इशारा देण्यासाठी येत्या मंगळवारी खाण अवलंबित सकाळी दहा वाजता कदंब बसस्थानकाजवळील क्रांती सर्कलजवळ जमून धरणे धरतील, असे मंगशेकर यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)