विधानसभेसाठी विचारलेले प्रश्न गायब; रोहन खंवटे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 12:46 PM2020-01-21T12:46:26+5:302020-01-21T12:48:09+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३ फेब्रुवारी रोजी सुरू होत असून पाच दिवस चालणार आहे.
पणजी: गोवा विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विचारलेले आपले काही प्रश्न गायब केले गेल्याचा खळबळजनक आरोप अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी केला आहे. आपले प्रश्न सरकारला अडचणीत आणणारे होते ते गायब करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३ फेब्रुवारी रोजी सुरू होत असून पाच दिवस चालणार आहे. या अधिवेशनासाठी आपण लेखी स्वरूपात प्रश्न पाठवले होते,ते गायब केले गेल्याचा आरोप करणारे पत्र खंवटे यांनी विधिमंडळ सचिवांना पाठवले आहे. आपल्या तक्रारीत ते म्हणतात की, वेगवेगळ्या खात्यांच्या कारभारावर आधारित तारांकित व अतारांकित मिळून वेगवेगळे प्रश्न मी गेल्या ८, ९, १०,१३ व १४ जानेवारीला पाठवले होते, ते गायब करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे असलेल्या वित्त आणि शिक्षण या महत्त्वाच्या खात्यांवर हे प्रश्न होते, नेमके हेच प्रश्न गायब करण्यात आले आहते. हे प्रश्न वगळले असतील तर ते का वगळले हे मला कळायला हवे. विधिमंडळ खात्याकडून काही त्रुटी राहिलेल्या असल्यास त्या सुधारायला हव्यातआणि आपले प्रश्न कामकाजात घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
खंवटे हे गेल्या जुलैपर्यंत होते. सरकारात ते महसूलमंत्री होते. परंतु जुलैमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकल्यानंतर ते आता सरकार विरोधात आहेत. विरोधी आमदारांनी विचारलेले महत्वाचे प्रश्न गायब केले जात असल्याने अन्य विरोधी आमदारांनीही नाराजी व्यक्त केली आहे.