नरेंद्र सावईकर, दामू नाईक, बाबू कवळेकरांत 'शर्यत'; तवडकर यांचाही लोकसभा तिकिटासाठी नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2024 12:56 PM2024-02-14T12:56:28+5:302024-02-14T12:56:54+5:30

आमदार दिगंबर कामत यांच्या पाठोपाठ सभापती रमेश तवडकर यांनीही आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले आहे.

race between narendra sawaikar damu naik and babu kavlekar for candidature for lok sabha election 2024 | नरेंद्र सावईकर, दामू नाईक, बाबू कवळेकरांत 'शर्यत'; तवडकर यांचाही लोकसभा तिकिटासाठी नकार

नरेंद्र सावईकर, दामू नाईक, बाबू कवळेकरांत 'शर्यत'; तवडकर यांचाही लोकसभा तिकिटासाठी नकार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभेच्या उमेदवारीसाठी दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपच्या तिकीटासाठी माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार दामू नाईक व माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर या तिघांमध्येच शर्यत आहे. पाचजणांची नावे जरी, भाजपच्या गोवा टीमने दिल्लीत पाठवली तरी, पाचपैकी दोघांनी आपल्याला लोकसभेचे तिकीट नको अशी भूमिका घेतली.

आमदार दिगंबर कामत यांच्या पाठोपाठ सभापती रमेश तवडकर यांनीही आपण लोकसभानिवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले आहे. सोमवारी पक्षाचे निवडणूक प्रभारी आशिष सूद यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक घेतली. यात तवडकर यांच्या नावाचीही चर्चा झाली होती. तवडकर हे त्यावेळी बैठकीस उपस्थित नव्हते. ते नंतर पोचले.

'लोकमत'शी बोलताना तवडकर म्हणाले की, पाच जणांच्या यादीत माझे नाव असले तरी लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही. दिगंबर कामत यांच्यानंतर तवडकर यांनीही आपल्याला निवडणूक लढवायची नाही, असे स्पष्ट केल्याने आता तिकिटासाठी तिघांमध्येच स्पर्धा राहिलेली आहे. पक्ष सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार ही नावे दिल्लीला पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाकडे पाठवण्यात आली आहेत. तेथूनच उमेदवार जाहीर केला जाईल.

उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यातच भाजप उमेदवार अगोदर जाहीर करील असे पक्ष सूत्रांनी स्पष्ट केले. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी दक्षिण गोवा मतदारसंघात सर्वेक्षण करून घेतलेले आहे. ख्रिस्ती व हिंदू मते कु णाच्या बाजूने किती प्रमाणात पडू शकतात याचा अंदाज भाजपला सर्वेक्षणातून आलेला आहे.

नरेंद्र सावईकर: माजी खासदार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते निवडून आले होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत मात्र त्यांना काँग्रेस उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांच्याकडून केवळ ९ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. सावईकर यांनी पराभूत झाले तरी आपले काम चालूच ठेवले. सावईकरही प्रदेश भाजपचे सरचिटणीस आहेत. ते मास लिडर नसले तरी, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये ते खूप परिचित आहेत.

बाबू कवळेकर: कवळेकर हे मास लिडर आहेत. ते सातत्याने विधानसभा निवडणुका जिंकत आले होते, पण फेब्रुवारी २०२२ च्या निवडणुकीत पराभूत झाले. कवळेकर यांनी तिकिटावर दावा करून दक्षिण गोव्यात फिरणे सुरूच ठेवलेले आहे. दीडेक वर्षापासून आपल्या कामाची व्याप्ती केवळ केपे मतदारसंघापुरतीच न ठेवता पूर्ण दक्षिण गोव्यात वाढवली. प्रत्येक धार्मिक कार्यात ते भाग घेतात. दक्षिणेत त्यांनी लोकसंपर्क वाढवला आहे.

दामू नाईक: हे भाजप संघटनेच्या कामानिमित्त दक्षिण गोव्यात ठिकठिकाणी फिरतात. त्यामुळे त्यांनी लोकसंपर्क कायम ठेवला आहे. ते भाजपचे सरचिटणीस आहेत. फातोर्डा मतदारसंघात त्यांना विधानसभा निवडणुकांमध्ये अपयश आल्यानंतर तेही राजकीय 'पुनर्वसना'च्या प्रतीक्षेत आहेत. खासदारकीचे तिकीट किंवा भाजप प्रदेशाध्यक्ष यापैकी एखादी गोष्ट दामू नाईक यांना यावर्षी मिळेल असे कार्यकर्ते मानतात.

 

Web Title: race between narendra sawaikar damu naik and babu kavlekar for candidature for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.