फसवणुकीसाठी राहुलने देशाची माफी मागावी, राफेल मुद्द्यावर जावडेकर यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 02:44 PM2018-12-15T14:44:47+5:302018-12-15T14:45:07+5:30
राफेल डील हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रामाणिक करार असल्याचे शिक्कामोर्तब सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर झाल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.
पणजी: राफेल डील हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रामाणिक करार असल्याचे शिक्कामोर्तब सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर झाल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. गोवा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी गोव्यात आलेले जावडेकर हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी देशाच्या सुरक्षा यंत्रणांवर व सुरक्षा व्यवस्थेवर राहुल गांधीनी संशय घेतला. राफेल कराराबद्दल अपप्रचार करून सरकारची आणि पर्यायाने देशाची बदनामी केली. या मुद्द्यावर त्यांना कधी चर्चा करायला नको होती, केवळ खोटे बोलून अपप्रचार करायचा इरादा होता. आजही ते संसदेत तेच करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर सत्य आता जनतेसमोर आले आहे.
इतके दिवस लोकांची फसवणूक करण्याचा गुन्हा राहुल गांधी यांनी केला आहे. देशाची त्यांनी माफी मागितली पाहिजे असे ते म्हणाले.
लोकांचा विश्वास आजही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आहे. कॉंग्रेसने कितीही खोटारडेपणा केला तरी त्यांचे इरादे फलदायी होणार नाहीत असे त्यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या तीन राज्यांतील निवडणुकीत भाजपला स्वीकारावा लागलेल्या पराभवाचा राफेल मुद्द्याशी संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.