रेल्वेसेवेतील गुंतवणूक हाच पर्याय!
By admin | Published: June 1, 2017 02:20 AM2017-06-01T02:20:10+5:302017-06-01T02:20:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : भारतीय अर्थव्यवस्थेचा जलद विकास हा रेल्वेतील गुंतवणुकीच्या मार्गानेच शक्य असल्याचा दावा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : भारतीय अर्थव्यवस्थेचा जलद विकास हा रेल्वेतील गुंतवणुकीच्या मार्गानेच शक्य असल्याचा दावा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे बुधवारी केला. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा विकास त्यासाठी आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले.
दोनापावल-पणजी येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये भारतीय रेल्वेसंबंधित आयोजित कार्यक्रमात रेल्वेमंत्र्यांनी सुरुवातीला ज्या मार्गाने आर्थिक विकास साधला त्याची माहिती दिली. सर्व ठिकाणी एकाच बरोबर विकास साधणे अशक्य आहे, ही गोष्ट चीनने जाणून घेऊन देशभरातील काही शहरांचा विकास केला. त्यानंतर ती शहरे उत्कृष्ट दर्जाची रेल्वेसेवा देऊन जोडली गेली. अशा पद्धतीने टप्प्या-टप्प्याने संपूर्ण देश विकसित केला. भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने भारत आणि चीनमध्ये साम्य आहे. रेल्वे क्षेत्रात साधनसुविधांचा विकास हा देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. त्यासाठी चांगली सुरुवातही केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाचा ताबा घेतल्यानंतर परिस्थिती समजून घेण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्यात आली आणि त्यात नमूद केलेल्या सर्व गोष्टींची आपण सादर केलेल्या दोन्ही रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. त्यामुळे अडीच वर्षांत रेल्वेत भरपूर सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय अर्थव्यवस्थेची १० टक्क्यांनी वाढ करण्याची क्षमता आहे; परंतु त्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणूक आणि कार्यवाही पाहिजे, असे ते म्हणाले. चांगले परिणाम देण्यासाठी चांगली गुंतवणूक आवश्यक असते. रेल्वेच्या बाबतीत ती सुरू करण्यात आली आहे. भारतीय रेल्वे सेवा ही जलद गतीची वाय-फाय नेटवर्क असलेली जगातील सर्वात जास्त लांबीची रेल्वे सेवा असल्याची माहिती खुद्द गुगलने दिल्याचे त्यांनी सांगितले. कोकण रेल्वेतही वाय-फाय देण्याचे काम सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. चेंबर आॅफ कॉमर्स आणि इंटरनॅशनल सेंटरतर्फे प्रभू यांचा सत्कार करण्यात आला.