कॅसिनोविरोधात सोमवारी रायबंदर बंद
By admin | Published: July 21, 2016 02:19 AM2016-07-21T02:19:12+5:302016-07-21T02:27:54+5:30
पणजी : रायबंदर येथे चोडणच्या दिशेने नांगरून ठेवालेले फ्लॉटेल तेथून हटवण्यास सरकारला अपयश आल्याने सोमवार,
पणजी : रायबंदर येथे चोडणच्या दिशेने नांगरून ठेवालेले फ्लॉटेल तेथून हटवण्यास सरकारला अपयश आल्याने सोमवार, २५ जुलै रोजी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी रायबंदरवासीयांनी रायबंदर बंदची हाक दिली आहे.
सरकारने हे फ्लॉटेल न हटवल्यास प्रसंगी आंदोलन राज्यपातळीवर नेले जाईल, असा इशारा अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी बुधवारी रायबंदर येथे पत्रकार परिषदेत दिला. कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर, नगरसेवक रूपेश हळर्णकर व रायबंदरचे नागरिक या वेळी उपस्थित होते. कॅसिनोच्या प्रश्नावर लवकरच राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी करण्यात येणार आहे. यासाठी राज्यपालांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याचे अॅड. रॉड्रिग्स यांनी सांगितले.
फ्लॉटेलविरोधात रायबंदरवासीयांनी ७ जुलै रोजी जाहीर सभा घेतली होती. यात हे फ्लॉटेल हटविण्यासाठी सरकारला १५ दिवसांची मुदत दिली होती. मात्र, मुदत संपत आली तरी काहीच हालचाली न केल्याने शांततापूर्ण पध्दतीने रायबंदर बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला काही सत्ताधारी आमदारांबरोबर इतर काही आमदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. आमदारांनी विधानसभेत कॅसिनोप्रश्नी लक्षवेधी सूचना मांडण्याबरोबरच खासगी विधेयक देखील मांडावे, अशी मागणी रॉड्रिग्स यांनी केली.