राज्यात पावसाचा हाहाकार; जनजीवन विस्कळीत, रस्त्यांना नदीचे स्वरुप
By समीर नाईक | Published: July 7, 2024 02:39 PM2024-07-07T14:39:50+5:302024-07-07T14:40:06+5:30
अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापनाची खास टीम यांचीही धावपळ सकाळपासून सुरु आहे.
समीर नाईक / गोवा पणजी: रविवारी सकाळपासून जोरदार पावसाने राज्याला झोडपून काढले. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याचे, पडझड झाल्याची घटना समाेर आल्या आहेत, तर आले आहे. पेडणे, डिचोली, साखळी, वाळपई, फोंडा, कुठ्ठाळी, सांगे, काणकोण या भागात झाडे, घरे कोसळण्याचे प्रकारही समोर आले आहे. अनेक ठीकाणी लोकांच्या घरांमध्ये देखील पाणी शिरले आहे. अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापनाची खास टीम यांचीही धावपळ सकाळपासून सुरु आहे.
गोवा रेड अलर्टवर असून, रविवारी पहाटेपासूनच न थांबता जोरदार पाऊस सुरु आहे. यातून जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेकांनी घरातून बाहेर निघणे टाळले आहे. दरड, झाडे कोसळल्याने अनेक रस्ते बंद ठेवण्यात येत आहे, परीणामस्वरुप वाहतुकही ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी सकाळपासूनच वीजही गायब झालेली आहे. डिचोली, सत्तरीतील अनेक नद्यांच्या पातळीत वाढ झालेली देखील दिसून येत आहे.
स्मार्ट सिटी पणजीतील रस्त्यांना नदीचे स्वरुप
रविवारी पडलेल्या स्मार्ट सिटी पणजीतील रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. अनेक मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहे. साेमवारी पावसाचे प्रमाण तुलनेत खुप कमी होते, तरी पाटो प्लाझा येथील अनेक रस्त्यांवर भरतीमुळे पाणी तुंबले होतेे. पार्किंग केलेली वाहने देखील अर्धी बुडलेली होती. यापेक्षा अधिक बिकट स्थिती रविवारी पाटो भागाची झाली आहे. वाहनचालकांना या पाण्यातून वाट काढणे देखील कठीण बनले आहे. पाटोत अनेक ठिकाणी सांडपाणी वाहीनींचे चेंबर्स फुल्ल झाल्यानेे हे पाणी देखील पावसात साठलेल्या पाण्यात मिसळल्याने दुर्गंधी पसरली आहे.
अग्निशामक दलाची चेतावणी
राज्यात सुरु असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण घरातून बाहेर न जाण्याची चेतावणी अग्नीशामक दलाने दिली आहे. तसेच ज्यांची घरे मातीची आहे, त्यांनी विषेश काळजी घेत, आपल्याला सुरक्षित ठेवावे. अनेक ठिकाणी पडझड होत असल्याने आम्हाला वेळेत घटनास्थळी पोहचणे शक्य होत नाही, त्यामुळे लोकांनी प्राथमिक स्तरावर काळजी घ्यावी, असेही दलाने म्हटले आहे.