राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 'पावसाचा खेळ'; परिस्थिती नियंत्रणात
By समीर नाईक | Published: November 8, 2023 03:52 PM2023-11-08T15:52:25+5:302023-11-08T15:52:58+5:30
स्पर्धेला शेवटचे दोन दिवस राहिले असताना पावसाचा खेळ सुरू झाला आहे. पावसावमुळे स्पर्धेतील अनेक सामग्री खराब झाली आहे.
पणजी: मंगळवारी रात्रीपासून राज्यात पावसाने विजांचा गडगडाटसह लावलेल्या हजेरीमुळे ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या बुधवारी होणाऱ्या काही सामन्यांवर परिणाम दिसून आला. प्रामुख्याने आऊटडोअर ठिकाणावर याचा जास्त प्रभाव दिसून आला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला शेवटचे दोन दिवस राहिले असताना पावसाचा खेळ सुरू झाला आहे. पावसावमुळे स्पर्धेतील अनेक सामग्री खराब झाली आहे. सध्या खराब वातावरणामुळे हवाई बीचवर सुरू असलेली याॅटिंग स्पर्धा देखील रद्द करण्यात आली आहे.
क्रीडा ग्राम सर्वाधिक प्रभावित
पावसाचा सर्वाधिक फटका कांपाल येथील क्रीडा ग्रामला बसला आहे. येथे मैदानावर चारही बाजूने पाणी भरले होत. जनरेटर कक्ष पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. जेथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होत होते, त्याचे तीन तेरा वाजले आहेत. काही ठिकाणी तर तंबूत आतही पाणी पोहचले होते. बाहेर तर चिखलच झाला आहे. नंतर अग्नीशामक दलाने पंपच्या सहाय्याने हे पाणी काढण्यात आले. सर्वकाही पूर्वरत झाल्यानंतर येथे स्पर्धा खेळविण्यात आली. क्रीडा ग्राम येथे सध्या योगासने व ज्युडो हे क्रीडा प्रकार सुरू आहेत.
जेवण व्यवस्था डगमगली
स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडू, प्रतिनिधी, स्वयंसेवक यांच्यासाठी खास जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. ही व्यवस्था पावसामुळे डगमगली आहे. अनेक ठिकाणी चिखल झाला असल्याने एकाच ठिकाणी जेवण तयार करून, नंतर ते सगळीकडे पोहचविण्यात आले. तसेच हे करताना कुणालाच काही त्रास सहन करावा लागू नये याचीही काळजी यावेळी घेण्यात आली.
क्रीडा मंत्र्यांनी केली पाहणी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी बुधवारी सकाळपासूनच विविध ठिकाणावर भेट देत तेथील आढावा घेतला. कंपाल येथील क्रीडा ग्रामाचाही गावडे यांनी आढावा घेतला. सगळकाही लवकर पूर्वपदावर येईल याची काळजी घेतली. व्हेनु कमांडट, पोलिस, अग्नीशामक दल, व खेळाडू यांच्याशी त्यांनी चर्चा करत काय अडचणी आहेत, त्या ऐकून घेतल्या.
मंगळवरी रात्रीपासून जेव्हा सुरू झाला, तेव्हा पासून आम्ही या सर्व गोष्टींचा विचार करत होतो. पोलिस व अग्नीशामक यंत्रणा आधीच तयार करून ठेवण्यात आली होती. जेवणाच्या बाबतीतही रात्रीच निर्णय घेण्यात आला होता, की काही ठिकाणे बंद ठेऊन तेथे जेवण पोहचविण्यात येईल. आम्ही या परिस्थितीसाठी आधीच तयार असल्याने, स्पर्धा काही तासातच पुन्हा सुरू करण्यात आल्या. आता सर्वकाही सुरळित सुरू आहे.
- गोविंद गावडे, क्रीडामंत्री