ऐन दिवाळीत राज्यात पावसाचा तडाखा; झाडे कोसळली, वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2024 08:10 AM2024-11-01T08:10:57+5:302024-11-01T08:15:13+5:30

सत्तरीसह डिचोली तालुक्याला झोडपले; वाळपईत वादळी वाऱ्याचा जोर

rain lashed the goa state on diwali | ऐन दिवाळीत राज्यात पावसाचा तडाखा; झाडे कोसळली, वीज पुरवठा खंडित

ऐन दिवाळीत राज्यात पावसाचा तडाखा; झाडे कोसळली, वीज पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी/नगरगाव : राज्यात काल, गुरुवारी, सलग दुसऱ्या दिवशी सत्तरी डिचोलीसह अन्य भागाला पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने. गटारे तुडुंब भरून दुकानांमध्ये पाणी शिरले. रस्ते पाण्याने भरल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पडझडही झाली. साखळी, डिचोली तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. 

पावसाने राज्यात दिवाळीच्या उत्साहावर विरजण घातले. बुधवारी नरक चतुर्दशीच्या दिवशीही काही ठिकाणी पाऊस झाल्याने अनेक नरकासुर भिजले. तसेच काल गुरुवारीही सत्तरी, डिचोलीसह अनेक शात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे लोकांना दिवाळीच्या उत्सवाचा आनंद घेता आला नाही. दिवाळीनिमित्त लोकांनी घरे सजवली आहेत. घरांवर विद्युत रोषणाई करून आकर्षक, आकाशकंदील लावले आहेत; पण मुसळधार पाऊस बरसल्याने काही ठिकाणी आकाशकंदील, विद्युत माळा खराब झाल्या. पाऊस पडत असल्याने लोकांच्या उत्साहावर मर्यादा आल्या. हवामान खात्याने आजही यलो अलर्ट दिल्याने जोरदार पावसाची शक्यता आहे.

डिचोलीत तीन लाखांची हानी 

डिचोली तालुक्यातील विविध भागांत गुरुवारी दुपारी पावसाने झोडपून काढले. डिचोलीत राधाकृष्ण विद्यालय परिसरात वृक्ष पडून विद्यालयाच्या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले. तालुक्यात वादळी वारा, विजेचा कडकडाट व गडगडासह पाऊस कोसळत होता. त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला. तालुक्यात अनेक भागांत पडझड झाली. मयेतील देवसू भटवाडी येथील अश्वेक कारबोटकर यांच्या घरावर झाड कोसळून सुमारे दोन लाखांची हानी झाली. यात एकजण किरकोळ जखमी झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी अडथळा दूर करण्याची कामगिरी बजावली. तालुक्यात सुमारे तीन लाखांहून अधिक किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

झेंडूच्या फुलांना फटका 

यंदा पाऊस पडत असल्याने झेंडूच्या फुलांनाही फटका बसला. दिवाळीच्या सणाला झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. पण यंदा विक्रेते रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आढळून आले नाहीत. पाऊस असल्याने झेंडूची फुले कुजली. त्यामुळे काही ठिकाणी फुले १८० ते २०० रुपये किलोने विकली गेली. तर मोठ्या प्रमाणात फुले पावसामुळे लवकर कुजली.

झाडे कोसळली; वीज पुरवठा खंडित 

वादळी वारे आणि मुसळधार पावसाने वाळपईसह परिसराला झोडपून काढले. वाळपई नगरपालिका परिसराला याचा मोठा फटका बसला. ठाणे रस्त्यावर सागवान झाड कोसळून वाहतूक काही काळ ठप्प झाली. वीज वाहिनीवर झाड पडल्याने तारा तुटल्या. वाळपई टेलिफोन एक्सचेंजजवळही रस्त्यावर झाड कोसळले. वेळूस-सुंदरवाडा येथील हनुमान विद्यालयाजवळही रस्त्यावर झाडे पडली. त्यामुळे काही खोळंबली. मलपण, पाडेली परिसरालाही पावसाचा तडाखा बसला. जनजीवन विस्कळीत झाले. वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत झाडे बाजूला करून रस्ता सुरळीत करून देण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली. वाळपई पोस्ट खात्याच्या इमारतीजवळ गटार व्यवस्था कोलमडल्यामुळे पाण्याचा मोठा लोट वाहताना दिसत होता.

 

Web Title: rain lashed the goa state on diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.