पावसाची दांडी, शेतीचे कसे होणार? शेतकऱ्यांमध्ये चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 08:42 AM2023-09-04T08:42:24+5:302023-09-04T08:43:58+5:30
पाण्याअभावी डोंगरी, मरड भात पिक करपण्याची भीती.
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : काही दिवसांपासून राज्यात पावसाने दांडी मारली असून, नागरिकांना सध्या कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या भात शेतीचे तसेच अन्य पीक पावसाअभावी करपून जाण्याची भीती वाढत आहे. पावसाने पाठ फिरवली तर शेतीचे पुढे काय होईल, अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे.
दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या पावसाचे यंदा उशिरा आगमन झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांना उशिरा भात शेतीची लागवड करावी लागली होती. जून महिन्यामध्ये दांडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यामध्ये झोडपून काढले होते. जोरदार पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीला तयारी केली होती. गेल्या काही दिवसांपासून पाऊस पुन्हा गायब झाल्यामुळे सध्या लागवड केलेल्या शेतजमिनीवर भेगा पडलेल्या आहेत. विशेष करून डोंगरी व मरड शेतीमधील पिके करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. लागवड केलेल्या पिकाला सध्या पावसाची अत्यंत गरज आहे; परंतु सध्या कडक ऊन पडत आहे. अचानक पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले कष्ट वाया जाण्याची शक्यता आहे.
फोंडा तालुक्यामध्ये अनेक डोंगरी भागामध्ये काकडे, गोसावी अन्य पिकांची लागवड केलेली आहे. सध्या या पिकांच्या वेली करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. कडक ऊन अनेक पिकांसाठी मारक ठरत आहे. असेच तापमान आणखी काही दिवस राहिल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
गणेश चतुर्थी सण काहीच दिवसांवर आला आहे. या दिवसात काकडी, दोडगी तसेच अन्य भाज्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. आणखी काही दिवस असेच ऊन पडत राहिल्यास वेली सुकून जातील व गणेश चतुर्थीला पीक मिळणे अशक्य होईल.
याविषयी शिरोडा येथील 'पार्वती नाईक यांनी सांगितले की, आपली शेती डोंगराच्या खालच्या भागात असूनही कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. पाऊस नसल्याने डोंगराळ भागांमध्ये लागवड करण्यात येत असलेली शेती पूर्णपणे सुकून जाईल. या दिवसात पिकाची कणसं बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु होते. या दिवसात शेतीला पावसाची अत्यंत आवश्यकता असते. अन्यथा पीक नष्ट होण्याची शक्यता असते.
याविषयी बेतोडा येतील शेतकरी मंगलदास गावकर यांनी सांगितले की, यंदा जून महिन्यात पावसाने सुमारे २२ दिवस विलंब केल्यामुळे लागवड करण्यात आलेली दोडगे, भेंडी, काकडी तसेच अन्य पिके टिकून ठेवण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात व जुलै महिन्यात सतत पडलेल्या पावसामुळे शेतकयांना पुन्हा नुकसान सहन करावे लागले. त्यात आता मागील काही दिवसांपासून राज्यात कडक ऊन पडत असल्यामुळे वेली सुकण्याच्या मार्गावर आहेत. दिवसा कडक ऊन असले तरी रात्रीही पाऊस पडत नसल्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. - मंगलदास गावकर.