रेनकोट, गणवेशांचा अद्याप पत्ता नाही!
By admin | Published: May 16, 2017 02:24 AM2017-05-16T02:24:28+5:302017-05-16T02:26:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : येत्या वीस दिवसांत नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ५४ टक्के पाठ्यपुस्तके
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : येत्या वीस दिवसांत नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ५४ टक्के पाठ्यपुस्तके आतापर्यंत शिक्षण खात्याकडून तालुका भागशिक्षणाधिकाऱ्यांकडे पोहोचली आहेत; पण रेनकोट व गणवेशांचा अजूनही पत्ता नाही.
अर्धा पावसाळा संपुष्टात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हाती रेनकोट दिले जातात हा वार्षिक अनुभव झालेला आहे, असे काही पालकांनी सांगितले. यंदा पाऊस लवकर सुरू होत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल. तोपर्यंत मुलांना रेनकोट मिळालेले असतील, असे म्हणण्यासारखी स्थिती नाही. अगदी उशिरा म्हणजे पावसाळा संपता संपता जे रेनकोट मुलांना दिले जातात, तेही योग्य दर्जाचे नसतात, असे काही पालकांचे मत आहे.
विद्यार्थ्यांना गणवेश शिवून देऊ नका, तुम्ही कूपन द्या, आम्ही शिवून घेतो, असे यापूर्वी अनेकदा पालकांनी शिक्षण खात्याला व सरकारला सांगून पाहिले. मात्र, या वेळीही जुनीच पद्धत स्वीकारण्यात आली आहे. मुलांना जे गणवेश सरकारी यंत्रणेकडून पुरविले जातात, ते अघळपघळ असतात. कपड्याचा दर्जा ठिक नसतोच. शिवाय अनेक विद्यार्थ्यांना ते गणवेश योग्य स्थितीत होतच नाहीत. शाळेमध्ये येऊन संबंधित कर्मचारी शर्ट तसेच हाफपॅन्टचे माप घेऊन जातात; पण प्रत्यक्षात गणवेश देताना तो ठिक दिला जात नाही, असा अनुभव अनेकांनी सांगितला. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक-दोन महिने झाल्यानंतर मग कधीतरी गणवेश मिळेल. तोपर्यंत पालकांनीच स्वखर्चाने आपल्या मुलांना गणवेश शिवून घेतलेले असतात. खादी मंडळाकडे रेनकोट व गणवेश वितरणाचे काम सरकारने सोपवले आहे.
दरम्यान, या वेळी प्रथमच पाठ्यपुस्तके मात्र वेळेत येऊ लागली आहेत. याबाबत भागशिक्षणाधिकाऱ्यांमध्येही समाधानाची भावना आहे. सांगे व काणकोण तालुक्यात सर्व विषयांची पाठ्यपुस्तके १०० टक्के पोहोचली आहेत. अन्य तालुक्यांमध्ये वितरण सुरू आहे. आतापर्यंत सरासरी ५४ टक्के पाठ्यपुस्तकांचे राज्यात वितरण झाल्याचे शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.