पावसामुळे पडझड सुरूच, ऑरेंज अलर्ट जारी; सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2024 09:46 AM2024-07-14T09:46:38+5:302024-07-14T09:47:05+5:30
२४ तासांत १०१ मिमी वृष्टी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने जोर धरला असून काल, शनिवारीही सर्वत्र मुसळधार पडला. यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. . तर काही ठिकाणी पावसामुळे घराच्या भिंतींची पडझड झाली. गेल्या २४ तासांत तब्बल १०१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. डिचोली, साळगावसह मडगाव परिसरात पडझडीच्या अनेक घटना घडल्या. बाणावली येथे माड पडून महिल महिला जखमी झाल्याची घटना घडली.
पावसाचा जोर पाहता हवामान खात्याने पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात न जाण्याचा इशाराही दिला आहे. गेले आठ दिवस राज्यात मुसळधार सुरूच असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात १ जून ते आतापर्यंत ६८.३३ पावसाची नोंद झाले आहे. पावसामुळे काल अनेकांच्या घरात पाणी शिरले. घरांवर झाडे उन्मळून पडून मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान झालेले आहे. तसेच धरणाप्रमाणे राज्यातील सर्व नद्या तसेच उपनद्या ओसांडून वाहू लागल्या आहेत. त्याचा फटका शेती बागायतींना मोठा फटका बसला आहे.
आमठाणे व अंजुने धरण पातळी वाढू लागलेली असून आमठाणे धरणाची पातळी भरण्याच्या मार्गावर आहे. सोमवारी किंवा मंगळवारी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
साळगावात भिंत कोसळली
पावसामुळे साळगाव येथील विष्णू कामत यांच्या घराची भिंत कोसळून दीड लाखांचे नुकसान झाले. पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांनी पडझड झालेला भाग हटविला. भितीसोबत घराच्या छपराचाही काही भाग पडल्याने घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले.
आतापर्यंत ६८.३३ इंच पाऊस
राज्यात १ जून ते १३ जुलैपर्यंत ६८.३३ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर वाळपई केंद्रात ८१.५४ इंच सर्वाधिक जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे साखळी, सांगे, केपे, काणकोण, मडगाव या केंद्रावरही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे.
डिचोलीत हानी
डिचोली तालुक्यात शनिवारी मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील बागायतीची तसेच काही घरांची हानी झाली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत कार्य केले. नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिराच्या परिसरातील झाड पडून नुकसान झाले. तसेच संजीव रावळ यांच्या घरावर झाड पडून हानी झाली. नार्वे येथे वीज वाहिन्यांवर झाड पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. तालुक्यात दिवसभरात अडीच इंच आसपास पावसाची नोंद झाली.